Corona Virus : पुणे महापालिकेच्या 'जम्बो'साठी पायघड्या, नायडू रुग्णालय मात्र वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 12:22 PM2020-09-07T12:22:16+5:302020-09-07T12:22:52+5:30
पुणे पालिकेकडून जम्बो रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण नायडूसाठी मागील पाच महिन्यांत काही लाख रुपयांचा टँक उभारता आलेला नाही.
- राजानंद मोरे-
पुणे : जम्बो रुग्णालयाच्या उभारणीसाठी कोट्यावधी रुपये देणारी महापालिका आपल्याच नायडू रुग्णालयाला मात्र वाऱ्यावर सोडताना दिसत आहे. मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात ऑक्सिजनची मागणी वाढत असताना केवळ ऑक्सिजन सिलेंटरवरच अवलंबून राहावे लागत आहे. सिलेंडर वेळेवर भरून मिळत नसल्याने रुग्णालयासाठी लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यासाठी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे.
नायडू रुग्णालयामध्ये यापुर्वीही पुरेशा सिलेंडर अभावी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्यात अडचणी आल्या होत्या. त्यानंतर नवीन सिलेंडर घेण्यात आल्याने काही दिवस ही अडचण दुर झाली. पण दळवी रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची मागणी वाढत गेल्याने तसेच नायडूमध्येही हाय फ्लो ऑक्सिजन पुरवठा वाढला. आता सिलेंडर असूनही वेळेवर भरून मिळण्यात अडचणी येत आहेत. ही धावाधाव टाळण्यासाठी बहुतेक मोठ्या रुग्णालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन टँकला प्राधान्य दिले जाते. ससून रुग्णालयात काही दिवसांत १३ हजार लिटरचे टँक उभारण्यात आले. नुकताच जुन्या इमारतीसाठीही ४ हजार लिटरच्या टँकची उभारणी करण्यात आली. दळवी रुग्णालयातही खासगी संस्थेने टँक दिले आहेत. पण याबाबतीत नायडूकडे दुर्लक्ष झाले आहे.
पालिकेकडून जम्बो रुग्णालयासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. पण नायडूसाठी मागील पाच महिन्यांत काही लाख रुपयांचा टँक उभारता आलेला नाही. एका ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सुमारे १ हजार लिटरच्या ऑक्सिजन टँक उभारणीसाठी सुमारे ६ ते साडे लाख रुपये खर्च येतो. या टँकमधून सुमारे १२० जम्बो सिलेंडर भरतील एवढा गॅस उपलब्ध होतो. खर्चात बचतीबरोबरच वाहतुकही सोपी असते.’ नायडूची सध्या गरज जवळपास दुप्पट असल्याने तसेच पुढील गरज ओळखून ४ ते ५ हजार लिटर क्षमतेच्या टँकची उभारणी करावी लागेल. या टँकचा कायमस्वरूपी उपयोग होऊ शकतो, तसेच सिलेंडरसाठी ऐनवेळी करावी लागणारी धावपळही थांबले.
----------
खर्चात होईल बचत
एका जम्बो सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरण्यासाठी सुमारे २५० रुपये खर्च येतो. तसेच त्याचा वाहतुक खर्च वेगळा असतो. तर लिक्विड ऑक्सिजनचा खर्च प्रति क्युबिक मिटर सुमारे २० रुपये एवढा आहे. एक हजार लिटरच्या टँकमध्ये सिलेंडर भरण्यासाठी सुमारे १७ ते २० हजार रुपये खर्च येतो. तर तेवढ्या क्षमतेच्या गॅस सिलेंडरसाठी जवळपास ३० हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे कायमस्वरूपी लिक्विड ऑक्सिजन टँकची उभारणी करणे आर्थिकदृष्ट्या परवडते.
-----------------
लिक्विड ऑक्सिजन टँकचे फायदे
- गॅस सिलेंडरच्या तुलनेत खर्च कमी
- वाहतुक करणे सोपे
- एकदा भरल्यानंतर सतत धावपळ करण्याची गरज नाही