Corona virus : खेड तालुक्यात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 05:41 PM2020-07-04T17:41:06+5:302020-07-04T17:42:31+5:30
खेड तालुक्यातील राजगुरुनगर ,चाकण,आळंदी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.
राजगुरुनगर: खेड तालुक्यात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शहर व परिसरात कडक कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी शनिवारी (दि. ४ ) खेड तालुका प्रशासन व पोलिसांना दिला आहे.
खेड तालुक्यातील राजगुरुनगर ,चाकण,आळंदी व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. यासाठी उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली खेड बाजार समिती येथील सभागृहात बैठक झाली. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, खेडचे आमदार दिलीप मोहिते, पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, प्रांत अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले पाटील, उपविभागीय अधिकारी गजानन टोंम्पे ,तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे, यांच्यासह विविध खात्यातील पदाधिकारी उपस्थित होते. राजगुरुनगर, चाकण ,आळंदी या नगर परिषद मार्फत शहरात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले,खेड तालुक्यातील ३४ गावांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्ण वाढत असतानाच ग्रामीण भागात सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढत आहे,सोशल डिस्टंसिंगचे नियमांचे उल्लंघन होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याचा धोका आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदीसह अन्य नियमांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असून त्या दृष्टीने आणखी कडक पावले उचलण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत.
राजगुरुनगर, आळंदी, चाकण या शहरात कोरोना बाधित व्यक्ती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काहीजण सरकारी नियम पाळत नाहीत याबाबत बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली प्रशासनाने गर्दी रोखणे व मास्क न वापरण्यावर कारवाई करण्यासाठी भरारी पथके नेमण्यात येणार आहे. चौकाचौकात पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रित करण्यासाठी प्रशासन व पोलीस यांच्या संयुक्त पथकामार्फत कडक कारवाई करणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
...........................................................
पुणे जिल्ह्यासह खेड तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने कडक उपाययोजना करण्याचा आदेश प्रशासन व पोलिसांना देण्यात आला. ज्या ठिकाणी रुग्ण आढळतील त्या त्या ठिकाणी कंटेन्मेंंट झोन जाहीर करणार आहे. तसेच नागरिकांनी कोरोनाला घाबरुन न जाता प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित व्यक्तीवर कोणी डॉक्टर उपचार करत नसेल तसेच ज्यादा पैसे आकारत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.चाकण येथील कोविड सेंटरमध्ये पंधराशे रुग्ण राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नवल किशोर राम , जिल्हाधिकारी, पुणे
.............................................................
कोरोना संसर्ग वाढत असतानाही जे नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरतात. तसेच मास्क न लावता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाही अशा व्यक्तीं वर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. लग्नकार्यात ५० लोकांची मुभा दिली असताना १००ते १५० नागरिक जमतात, यापुढे अशा सोहळ्यांवर पोलिसांची नजर असणार आहे.
संदीप पाटील, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण )