Corona virus : खेड तालुक्यातील अवाजवी बिले आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर होणार कडक कारवाई : आयुष प्रसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:56 AM2020-08-01T00:56:31+5:302020-08-01T00:56:47+5:30
खासगी रुग्णालयांकडून अवाजवी बिले देऊन नागरिकांची आर्थिक लूट केली केली जास्त असल्याच्या तक्रारी
राजगुरुनगर: खासगी रुग्णालयांच्या नफेखोरीवर चाप बसावा यासाठी राज्य सरकारने उपचारांचे दर निश्चित केले आहेत. तसंच राज्यातील सर्व रुग्णालयांना सरकारी आदेशाचं पालन बंधनकारक करण्यात आलं आहे.मात्र, असं असूनही खेड तालुक्यात काही रुग्णालयं कोविडच्या नावाखाली रुग्णांकडून लाखो रूपये वसूल करत आहेत अशा तक्रारी समोर येत आहेत.अशा डॉक्टर आणि रुग्णालयांची चौकशी करून दोषी आढळल्यास डॉक्टर्ससह रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याची कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला.
कोरोना स्थितीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली.त्यात खेड तालुक्यातील खासगी रुग्णालयांच्या नागरिकांनी केलेल्या तक्रारी बाबत चर्चा झाली.या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी आज (दि.३१) खेड पंचायत समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन माहिती खाजगी रुग्णालय व डॉक्टरांना इशारा दिला आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे,पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे,गटविकास अधिकारी अजय जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, भगवान पोखरकर,अमर कांबळे आदी उपस्थित होते.
मुख्याधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, खेड तालुक्यात कोरोनावर मात करण्यासाठी अत्यंत चांगले व्यवस्थापन झालेले आहे.शासकीय आणि खासगी रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वाना मोफत उपचार घेण्यासाठी शासनाची सुविधा उपलब्ध आहे.
कोविड उपचारासाठी शासनाने करार केलेल्या खासगी रुग्णालयात शासकीय यंत्रणेकडून आलेला रुग्ण घेण्यास टाळाटाळ केली जाते.रुग्ण असल्यास उपचारात हलगर्जीपणा होतो.खासगी कोविड रुग्णालयांच्या बिलांबाबत नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत. यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे.तात्काळ अहवाल तयार करण्यास सांगण्यात आलेले आहे.
दोषी आढळणाऱ्या डॉक्टर,रुग्णालयांवर थेट कारवाई होणार आहे. रुग्णवाहिकांना देखील शासनाने निर्गमित केल्याप्रमाणे किलोमीटरनुसार पैसे आकारता येतील.सर्व रुग्णालयानी दर पत्रक आणि त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या व शिल्लक असलेल्या बेड,व्हेंटीलेटर,ऑक्सिजनचे माहिती फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.असे ते म्हणाले.