Corona virus : पुणे विभागात मुबलक धान्यसाठा व भाजीपालाही : डॉ. दीपक म्हैसेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 06:15 PM2020-04-20T18:15:32+5:302020-04-20T18:16:48+5:30
नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते आहे.
पुणे: कोरोना विषाणुमुळे सध्या पुणे विभागात लॉकडाऊन असला तरीही अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा आहे. पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ४० हजार १६९ क्विंटल अन्नधान्यांची आवक झाली आहे. भाजीपालाही तब्बल ४९८ क्विंटल उपलब्ध आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ही माहिती दिली.
लॉकडाऊनमुळे नागरिकांना घड़ात बसून राहावे लागत आहे. मात्र, त्यांची अन्नधान्य तसेच फळफळावळ भाजीपाला यांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेतली आहे. सकाळच्या विशिष्ट वेळेत काही कालावधीपुरती दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळून याच वेळेत खरेदी करावी असे आवाहन म्हैसेकर यांनी केले आहे.
विभागात फळांची आवक ५ हजार १७२ क्विंटल आहे. कांदा, बटाटेही २१ हजार २१५ क्विंटल उपलब्ध झाले आहेत.
पुणे विभागात १९ एप्रिलला ९९ लाख लिटर दुधाचे संकलन झाले त्यापैकी २२ लाख ८४ हजार लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरणही झाले आहे अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली. नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करते आहे. नागरिकांनी सरकारने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे, गर्दी करून खरेदी करू नये तसेच जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याची काळजी प्रशासन घेत आहे, त्यामुळे अशा वस्तुंचा मोठा साठाही करू नये असे आवाहन त्यांनी केले.