Corona virus :पुण्यात 'ससून'मध्येही लवकरच उभी राहणार 'स्वॅब'तपासणी यंत्रणा; महापौर मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 08:10 PM2020-06-09T20:10:02+5:302020-06-09T20:20:43+5:30
राज्य शासन व पुणे महापालिकेच्या पुढाकारातून ही स्वॅब तपासणी यंत्रणा उभारणीसाठी २४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पुणे : पुणे शहरात एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू संस्था)बरोबरच आता ससून हॉस्पिटलमध्ये लवकरच दररोज दोन हजार स्वॅब तपासणीची यंत्रणा उभी राहणार आहे.२४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या मशिन्स् व टेस्टिंग किटच्या माध्यमातून प्रारंभी एक लाख स्वॅब तपासणी येथे होणार असून, टप्प्या टप्प्याने या टेस्टिंग किटमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात अधिकाधिक नागरिकांचे स्वब घेऊन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर वेळेवर उपचार देण्यासाठी, तसेच पॉझिटिव्ह रूग्णांपासून इतरांना संसर्ग होणार नाही यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. पुणे शहरात आजमितीला दररोज दीड ते दोन हजार नागरिकांचे स्वॅब (कोविड-१९)घेतले जातात. परंतू, ‘एनआयव्ही’कडील स्वब तपासणी क्षमतेच्या मर्यादेमुळे तपासणी अहवाल प्राप्त होण्यासाठी दोन-तीन दिवस थांबावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने राज्य शासनाकडे पुणे शहरात स्वॅब तपासणीची क्षमता वाढविण्याची मागणी केली होती.
या मागणीला अखेर यश आले असून, राज्य शासन व पुणे महापालिकेच्या पुढाकारातून ही स्वॅब तपासणी यंत्रणा उभारणीसाठी २४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. याकरिता राज्य शासन १० कोटी रुपये ,पुणे महापालिका ६ कोटी रुपये, पिंपरी-चिंचवड महापालिका ४ कोटी रुपये व जिल्हा नियोजन समितीच्यावतीने ४ कोटी असा २४ कोटी रूपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. तसेच ही यंत्रणा लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी ससून हॉस्पिटलच्या समन्वय समितीचे प्रमुख एस.चोक्कलिंगम् यांना सूचनाही देण्यात आल्याचेही महापौर मोहोळ यांनी सांगितले.
-------------
पुण्यात टप्प्या टप्प्यानेच सवलत
मुंबई मंगळवारपासून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली तरी, पुणे शहरात टप्प्या-टप्प्यानेच दुकाने खुली करण्यात येणार आहे. कोरोनावर मात करीत असताना सर्व व्यवहार सुरू केले गेले तर, कोरोना संसर्गावर आपण नियंत्रण ठेऊ शकणार नाही, असे मत महापौर मोहोळ यांनी व्यक्त केले. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कंटन्मेट झोनमध्ये सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत अत्यावश्यक सेवा आपण चालू केल्या असून, यात अन्नधान्य, दुध, औषधे याची दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. परंतू याठिकाणी सरसकट दुकाने उघडण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे कंटन्मेट झोन मध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्य सेवा खुल्या करू नयेत असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात सार्वजनिक वाहतुक सेवा सुरू करण्याचा विचारही महापालिका करीत असून, लवकरच पीएमपीएमएल संचालक मंडळाबरोबरच बैठक घेऊन, शहरात टप्प्या टप्प्याने सार्वजनिक वाहतुक सुविधा सुरू करण्यात येईल असेही मोहोळ यांनी सांगितले.