Corona virus : टास्क फोर्सने ९५ रुग्णांचे ७३ लाखांचे बिल केले कमी; खासगी रुग्णालयाच्या बिलांवर प्रशासनाची नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:17 PM2020-08-26T13:17:20+5:302020-08-26T13:18:16+5:30
पुणे ,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन..
निनाद देशमुख
पुणे: कोरोनाबाधित रुग्णांकडून अवाजवी बिले आकारून त्यांची लूट करणाऱ्या रुग्णांलयांवर प्रशासनाने आता करडी नजर ठेवली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात लेखा परीक्षक नेमले आहेत. तर जिल्ह्यात 20 भरारी पथके नेमली गेली आहे. १ लाखापेक्षा जास्त अशा १३२ बिलांचे लेखा परीक्षण पूर्ण केले असून यातील ९५ जणांचे जवळपास ७३ लाख ५६ हजार ५६८ रुपयांची बिले कमी केली आहेत.
शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयात देखील रुग्णांची उपचारासाठी गर्दी होत आहे. शासनाने या परिस्थितीत रुग्णांची लूट होऊ नये म्हणून कोविड सेंटर, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना यांसह अनेक उपाय योजना केल्या.मात्र तरीदेखील अनेक खासगी रुग्णालये रुग्णांना अवाजवी बिले देऊन त्यांची लूट करत असल्याचे समोर आले आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्रशासनाकडे आल्यानंतर रुग्णायांवर करडी नजर ठेवण्यासाठी 20जुलैपासून पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये प्रशासक तर मंगळवारपासून जिल्ह्यात भरारी पथके नेमले आहेत.
................................
बिलाबाबत दिलासा
कोरोना रुग्णांना हॉस्पिटलकडून प्रचंड बिल आकारून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य रुग्णांची लूट केली जात आहे. यासंदर्भात नागरिकांकडून विविध तक्रारी दाखल होत होत्या. यासाठी पुणे ,पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून त्याचा चांगला परिणाम दिसत आहे. गेल्या पंधरा दिवसात लाखो रुपयांची बिले कमी करण्यात आली आहे. तसेच हॉस्पिटलकडून जास्तीचे बिल आकारणे देखील कमी झाले आहे.
सौरभ राव ,विभागीय आयुक्त