Corona virus : पुण्यात ठराविक रक्तगटांच्या प्लाझ्मासाठी होतेय धावपळ; मागणी जास्त, दाते कमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2020 12:03 PM2020-09-09T12:03:52+5:302020-09-09T12:04:07+5:30

रक्तपेढ्या, सामाजिक कार्यकर्त्यांकडून दात्यांना तयार करण्यासाठी प्रयत्न

Corona virus: There is a rush for plasma of certain blood groups in Pune; The higher the demand, the lower the teeth | Corona virus : पुण्यात ठराविक रक्तगटांच्या प्लाझ्मासाठी होतेय धावपळ; मागणी जास्त, दाते कमी 

Corona virus : पुण्यात ठराविक रक्तगटांच्या प्लाझ्मासाठी होतेय धावपळ; मागणी जास्त, दाते कमी 

Next
ठळक मुद्देसध्या शहरात एबी या रक्तगटाच्या प्लाझ्माचा तुटवडा

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : प्लाझ्मा थेरपीमुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याची अनेक उदाहरणे सध्या पहायला मिळत आहेत. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने अतिगंभीर नसलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांना प्लाझ्मा देण्यास मान्यता दिली आहे. सध्या शहरात एबी या रक्तगटाच्या प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णाचे नातेवाईक सर्व पर्याय तपासून पाहत प्लाझ्मा मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत. दात्यांनी प्लाझ्मा दान करण्याबाबत टाळाटाळ करु नये, असे आवाहनही रक्तपेढ्या, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकत्यांकडून करण्यात येत आहे.

रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्लाझ्मासाठी रक्तपेढ्या, स्वयंसेवी संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. रक्ताने नाते ट्रस्टचे राम बांगड म्हणाले,  ए,बी, एबी या रक्तगटांसाठी खूप धावपळ करावी लागत आहे. प्रत्येक रुग्णाच्या नातेवाईकांनी कोणत्याही रक्तगटाचा किमान एक दाता घेऊन यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. रक्ताचे नाते सर्वांच्या मदतीसाठी तत्पर आहे. दात्यांनीही सध्याच्या कठीण काळाची गरज ओळखून आपणहून पुढे येणे आवश्यक आहे.’

अन्न आणि औषध प्रशासनाकडून ३७ पैकी २० रक्तपेढ्यांना प्लाझ्मा फेरेसिसची मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण ७२४ प्लाझ्मा दात्यांची नोंदणी झाली आहे. १६२४ प्लाझ्मा संकलन करुन १३६२ प्लाझ्मा वाटप करण्यात आले आहे. सध्या २४६ इतका प्लाझ्मा साठा शिल्लक आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पुणेप्लाझ्मा डॉट इन हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालय, ससून रुग्णालय आणि भारतीय जैन संघटना यांचा सक्रिय सहभाग आहे.

--------------------
एबी रक्तगटाचा प्लाझ्मा कोणत्याही रक्तगटाच्या रुग्णाला चालतो. मात्र, सध्या ‘ओ’ रक्तगटाचे जास्त दाते समोर येत आहेत. ए, बी आणि एबी रक्तगटाच्या प्लाझ्माचा मात्र तुटवडा जाणवत आहे. दिवसाला २५-३० रुग्णांसाठी प्लाझ्माची मागणी असते. त्यापैकी साधारण १५ रुग्णांची गरज भागते. दाते कमी प्रमाणात उपलब्ध होतात. काही जणांच्या अँटीबॉडी टेस्ट निगेटिव्ह येतात.
- डॉ. स्मिता जोशी, सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल
-----------
एबी पॉझिटिव्ह हा रक्तगट दुर्मिळ असल्यामुळे त्याचा जास्त तुटवडा जाणवत आहे. काही वेळा दात्यांची नोंदणी होते, मात्र फोन केल्यावर ते प्लाज्मा दानासाठी येतीलच याची शाश्वती नसते. बरेचदा टाळाटाळ केली जाते. एखाद्या रुग्णाला तातडीची गरज असेल तर प्रिझर्व्ह करून ठेवलेला प्लाज्मा दिला जातो आणि यादी पुन्हा तयार केली जाते.

- डॉ. सोनाली मराठे, पुना हॉस्पिटल ब्लड बँक

---------
अन्न आणि औषध प्रशासनाकडील प्लाज्मा उपलब्धतेची आकडेवारी

ब्लड बँक          दाते   संकलन     वाटप       उर्वरित
केईएम              ५१      १०२         ८७           १५ 
सह्याद्री            ८१      १६२        १४६           १६
ससून               १००    १९८        ११९           ७७
पीएसआय         ४         ८             ६           ०२
इंडियन सिरो.     ३         ६             ६           ००
रुबी हॉल            २२      ४४           ३४          १०
जनकल्याण       १४०    २८०         २५०         ३०
पुना हॉस्पिटल    ४४       ८८          ६०           २८

---------------------------------------------------------------------------------
                          ४४५     ८८८       ७०८         १७८
 

Web Title: Corona virus: There is a rush for plasma of certain blood groups in Pune; The higher the demand, the lower the teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.