Corona virus : कदमवाकवस्ती परिसरातील तीन जण कोरोनाबाधित; रुग्णांवर उपचार सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 04:58 PM2020-06-05T16:58:33+5:302020-06-05T16:59:29+5:30
पासष्ठ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेले आठ जण क्वारंटाईन
पुणे : लोणी काळभोर जवळील कदमवाकवस्ती परिसरात वावर असणारे व तांत्रिकदृष्ट्या फुरसुंगी हद्दीत वास्तव्यास असलेल्या एका पासष्ठ वर्षीय महिलेसह दोन जण कोरोनाबाधित असल्याचे गुरुवारी (ता. ४) आढळुन आले आहे. पासष्ठ वर्षीय महिलेला हडपसर येथील खासगी रुग्णालयात तर उर्वरीत दोन जणांना सिंहगड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पांडवदंड परिसरात वावर असणारे मात्र तांत्रिकदृष्ट्या फुरसुंगी हद्दीत रहिवाशी असलेल्या तीन जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पासष्ठ वर्षीय महिलेच्या संपर्कात आलेले पाच जण तर उर्वरीत दोन जणांच्या संपर्कात आलेले तीन जण अशा आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याची अशी माहिती फुरसुंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अरविंद कोकाटे यांनी दिली.
कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील पांडवदंड परिसरात मात्र फुरसुंगी हद्दीत नव्याने वसलेल्या एका नगरातील महिलेचा व दोन पुरुषांचा कोरोना रिपोर्ट गुरुवारी रात्री उशीरा पॉझिटिव्ह आला आहे. तीनही कोरोनाबाधित रुग्ण फुरसंगी हद्दीतील रहिवाशी असले तरी, वरील तीनही रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा वावर कदमवाकवस्ती हद्दीतील पांडवदंड परिसरात असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान याबाबत अधिक बोलताना कदमवाकवस्तीचे ग्रामविकास अधिकारी प्रविण देसाई म्हणाले, वरील तीनही रुग्ण फुरसंगी हद्दीतील रहिवाशी असल्याने, याबाबत योग्य ती काळजी घेण्याबाबत महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. नागरिकांना घराातुन बाहेर पडताना योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.