Corona virus : शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे मुंबईहुन आलेले तीन जण कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 02:40 PM2020-05-19T14:40:57+5:302020-05-19T14:42:24+5:30
सध्या मुंबई मधुन मोठ्या प्रमाणात लोक रात्री अपरात्री कोणतीही परवानगी न घेता गावाला येत आहे.
टाकळी हाजी : मुंबई येथुन कवठे येमाई (ता. शिरूर ) येथे परतलेल्या चार लोकांपैकी तीन लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच या लोकांना गावी सोडणारा आंबेगाव (साकोरे ) येथील जावयालाही कोरोनाची लागण झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडु नये दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी केले आहे .
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि . १५) मुंबई येथुन दोन लहान नातींना घेऊन आजी आजोबा रात्री आंबेगावमधील साकोरे येथील जावयाच्या गाडीत बसुन रात्री कवठे गावात आले. त्यांना कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर सोडून हा जावई फरार झाला .या आजी आजोबांचा मुलगा हा मुंबई येथे चालक असुन त्याला कोरोनोची लागण झाली. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही चाचणीसाठी आरोग्य विभागाने मुंबईतच ताब्यात घेतले . घरामधे राहणारे दोन मुली व आजी आजोबा रात्रीत जावयाला सोबत घेऊन कवठे येमाई येथे घेऊन आले. ही माहिती समजताच ग्रामस्थ व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना क्वांरंटाईन केले. मात्र नंतर संशय आल्याने औंध येथे जिल्हा रुग्णालय येथे रविवारी पाठविण्यात आले. त्या चौघांपैकी आजी आजोबा व एका मुलीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून जावयाचा रिपोर्ट ही पॉझिटिव्ह आला आहे . त्यामुळे कवठे येमाई परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत तहसिलदार लैला शेख यांनी तात्काळ प्रशासनाला सुचना दिल्या आहेत . सध्या मुंबई मधुन मोठ्या प्रमाणात लोक रात्री अपरात्री कोणतीही परवानगी न घेता गावाला येत आहे. तसेच गंभीर बाब म्हणजे याबाबत ते कोणतीही प्रशासनाला माहिती देत नाहीत. चार दिवसापुर्वी टाकळी हाजीमध्ये ही १२ लोक मुंबईमधुन दाखल झाले. ग्रामसेवक राजेश खराडे यांनी त्यांना तात्काळ क्वारंटाईन केले आहे .
त्यानंतर पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी तत्काळ मुंबई पुणे व परप्रांतीयसाठी छुपा रस्ता ठरलेल्या टाकळी हाजी येथे राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी नेमली .
शिरूर तालुक्यांच्या पश्चिम भागातील मोठ्या प्रमाणात नागरीक मुंबई, पुण्यामध्ये व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने असुन ते मोठ्या संख्येने छुप्या मार्गाने पोलिसांची नजर चुकवत गावाला परतत आहेत.