corona virus : परदेशवारी केलेल्या साडे चार हजार लोकांचे ट्रेसिंग सुरू; कोरोनामुळे खबरदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 09:41 AM2020-04-01T09:41:55+5:302020-04-01T09:50:02+5:30
राज्य शासनाकडून यादी : सर्व प्रवासी १२ ते २२ मार्च दरम्यान आले भारतात
लक्ष्मण मोरे -
पुणे : देशातीलआणि राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असन, विदेशवारी केलेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यातच १२ मार्च ते २२ मार्च दरम्यान विदेशातून आलेल्या ‘हाय रिस्क’ गटातील प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे .
राज्यात असे ४५ हजारांपेक्षा अधिक प्रवासी असून, पुण्यामध्ये तब्बल साडेचार हजार प्रवासी या कालावधीदरम्यान आल्याचे समोर आले आहे. राज्य शासनान ही यादी पुणे महापालिकेला पाठविली असन, पालिकेकडून क्षेत्रीय कार्यालय स्तरावर या प्रवाशांचा शोध सुरु केला आहे.
जागतिक स्तरावर कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. भारतामध्ये रुग्णांची संख्या आणि मृत्यू ची संख्या अन्य देशांच्या तुलनेने कमी असली तरी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे . मागील आठवड्याभरापासून संपूर्ण लॉकडाऊन सुरू आहे. जागतिक स्तरावर कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या कालावधीमध्ये अनेक भारतीय विविध देशात होते.अनेकजण विमानाने भारतात आले .देशातील विविध विमानतळावर उतरलेल्या या प्रवाशांमधून अनेकजण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. परंतु, १२ मार्च ते २२ मार्च या कालावधीमध्ये भारतातील विविध विमानतळांवर विदेशातून आलेले प्रवासी हे हाय रिस्क ग्रुपमध्ये गणलो जात आहेत. या प्रवाशांकडून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता गृहीत धरून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यामध्ये १२ ते २२ मार्च दरम्यान आलेले तब्बल ४५ हजार प्रवासी आहेत. राज्य शासनाने विविध महापालिका, नगरपालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा अशा प्रवाशांची यादी पाठविली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीतील तब्बल ४ हजार ५०० प्रवाशांची यादी राज्य शासनाने पाठविली आह. हे प्रवासी ‘हाय रिस्क ग्रुप’मधील असल्याने त्यांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आह.
........
क्षेत्रीय कार्यालयांकडे यादी
शासनाच्या निदेर्शानुसार महापालिकेने ही साडेचार हजार प्रवाशांची यादी क्षेत्रीय कार्यालयांना दिली आहे. या प्रवाशांचे पत्ते शोधून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांना त्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्वांचे बारकाईने सर्वेक्षण केले जाणार असून त्यांनी प्रवास केलेला कालावधी हा अत्यंत धोकादायक कालावधी मानला जात आहे. त्यामुळे हे प्रवासी शोधणे, त्यांच्यावर लक्ष ठेवणे, लक्षणाची तपासणी करीत राहणं हे मोठे आव्हान असणार आहे .