Corona virus : कोरोनामुळे पुण्यातील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 06:12 PM2020-04-21T18:12:58+5:302020-04-21T18:18:56+5:30
अवयवदात्यांची नोंदणी झाली असली तरी अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांकडून मागणी लक्षणीयरीत्या घटली.
प्रज्ञा केळकर-सिंग-
पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वाढत्या रुग्णसंख्येमुळे वैद्यकीय क्षेत्रावर कमालीचा ताण निर्माण झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारांवर सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये भर दिला जात आहे. याचा परिणाम अवयव प्रत्यारोपणावर झाला आहे. २३ मार्चनंतर पुण्यात एकही प्रत्यारोपण झालेले नाही. पुण्यातील खासगी रुग्णालयात शेवटचे यकृत प्रत्यारोपण झाले होते. 'लाईव्ह ट्रान्सप्लांट'मध्येही रुग्ण आणि नातेवाईक जोखीम घ्यायला तयार नसल्याने, अनेक प्रत्यारोपण शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. कोटायममध्ये काही दिवसांपूर्वी एक ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. मात्र, राज्यात गेल्या एक महिन्यात प्रत्यारोपण झालेले नाही.
राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष टीम तैनात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्यारोपणाच्या बहुतांश शस्त्रक्रिया लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. विभागीय प्रत्यारोपण समनव्य समितीकडे (झेडटीसीसी) काही अवयवदात्यांची नोंदणी झाली असली तरी अवयव प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या रुग्णांकडून मागणी लक्षणीयरीत्या घटली आहे. जिवंतपणी केले जाणारे अवयवदानाचे प्रमाणही सध्या कमी झाल्याचे वैद्यकीय तज्ञांकडून सांगण्यात आले. यकृत किंवा मूत्रपिंडाच्या प्रत्यारोपणापूर्वी दात्याची आणि रुग्णाची दोघांची कोवीड चाचणी केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.
किडनीच्या रुग्णांना डायलिसिस देऊन किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णांवर सध्या इतर पद्धतीने उपचार सुरू आहेत. एकीकडे, विभागीय अवयव उती प्रत्यारोपण समितीने (रोटो) अवयवदाता आणि प्राप्तकर्ता या दोघांच्याही कोव्हीड चाचण्या केल्या जाव्यात, अशा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे प्रत्यारोपण करावे किंवा करू नये, याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही, असे झेडटीसीसीकडून सांगण्यात आले. लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर मर्यादा आल्या आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेशबंदी आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण घटले आहे. रुग्णालयांकडून मागणी आल्यास झेडटीसीसीकडून प्रक्रिया पार पाडण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे.
------
सध्या कोवीडच्या उद्रेकामुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रियांवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीत प्रत्यारोपणाबाबत काय निर्णय घेतले जावेत, याबाबत चर्चा सुरू आहे. ब्रेन डेड व्यक्तींचे प्रमाणही कमी आहे. ब्रेन डेड व्यक्ती असेल तर तिच्या अवयवांचे प्रत्यारोपण कसे करायचे, याबाबत नियमावली तयार करण्यात येत आहे. त्यातून इंडियन सोसायटी आॅफ नेफ्रॉलॉजी आणि इंडियन सोसायटी आॅफ आॅर्गन ट्रांसप्लान्ट याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करतील. लाईव्ह ट्रान्सप्लांटच्या बाबतीत शस्त्रक्रिया लांबणीवर टाकणे शक्य होते. - फारुख वाडिया, अध्यक्ष, विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती.