Corona virus : गेल्या अडीच महिन्यांपासून पत्ते खेळण्यासाठी जमणाऱ्या अकरापैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 08:29 PM2020-06-22T20:29:53+5:302020-06-22T20:51:24+5:30
थेऊरफाटा परिसरातील एका मोठ्या हॉटेलमधील धक्कादायक प्रकार..
लोणी काळभोर : लॉकडाऊन काळात कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील एका मोठ्या हॉटेलच्या एका खोलीत गेल्या अडीच महिन्यापासुन पत्ते खेळण्यासाठी जमत असलेल्या अकरापैकी दोन जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याची धक्कादायक बाब सोमवारी ( २२ जून ) रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे.
या हॉटेलमधील रुम नंबर १०६ मध्ये हा डाव रंगत होता अकरा खेळाडूंपैकी दोन जणांचा स्वॅब ( घशातील द्रव ) चा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच, उर्वरीत नऊ जणांनी आपआपले स्वॅब विविध प्रयोगशाळेत पाठवले तपासणीसाठी आहेत. त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. दोन कोरोना बाधितांमध्ये लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या एका माजी सदस्याचा समावेश आहे. तर दुसरा हॉटेलच्या व्यवस्थापक आहे.
पुणे - सोलापुर महामार्गावर थेऊरफाटा परिसरातीस एका मोठ्या हॉटेलमधील एका खोलीत लॉकडाऊनच्या काळात गेले अडीच महिन्यापासून थेऊरफाटा व परीसरातील अकरा जण पत्ते खेळण्यासाठी जमत होते. यापैकी दोन जणांना घशाचा त्रास जानवू लागल्याने दोघांनाही उपचारासाठी तीन दिवसापुर्वी पुणे शहरातील दोन वेगवेगळंया रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना स्वॅबचे तपासणी अहवाल सोमवारी दुपारी आले. यात दोघेही कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने, थेऊरफाटा परिसरात खळबळ उडाली आहे. या दोघांसमवेत पत्ते खेळणाऱ्या उर्वरीत नऊ जणांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असुन त्याचा अहवाल मंगळवार दुपारपर्यंत येणे अपेक्षित आहे. या नऊ जणांचा स्वॅब तपासणी अहवाल आल्यानंतरच पूर्व हवेलीमधील कोरोनाबाबतचे पूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.
याबरोबर पूर्व हवेलीत सोमवार ( २२ जून ) रोजी कोरोनाचे आणखी दोन रुग्ण आढळुन आले आहेत. यामध्ये थेऊर गावातील एक ३५ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. हा लोहगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याला घशाचा त्रास जाणवू लागल्याने लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर कोरोगाव मुळ हद्दीतील एक ३२ वर्षीय कोरोनाबाधित असल्याचे आढळुन आले आहे. ही महिला लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात काम करते. या महिलेला हडपसर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.