Corona virus : कोरोना प्रतिबंधासाठी "आरोग्य सेतू" अॅप वापरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:00 PM2020-04-29T18:00:39+5:302020-04-29T18:11:06+5:30
नागरिकांनाही योग्य माहिती भरण्याचे आवाहन
पुणे : आपल्या परिसरातील कोरोना रुग्णांची तसेच आजाराची माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने विकसित केलेल्या आरोग्य सेतु हे अॅप राज्याच्या आरोग्य विभागाने वापरण्याच्या सुचना आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत. यासाठी संशयित तसेच रूग्णालयातून सोडण्यात आलेल्या संशयितांचे मोबाईल क्रमांक एकत्र करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून या अॅपबाबत नागरिकांमध्येही जागृती निर्माण करण्यास सांगितले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार अनेक उपाय योजना करत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने 'आरोग्य सेतु ' हे अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे कोरोना आजाराबद्दल माहिती मिळणार आहे. याच बरोबर आपल्या परिसरात असलेले कोरोना रूग्ण आणि संशयितांची माहितीही हे अॅप वापरणाऱ्यांना मिळणार आहे, असे केंद्र सरकारने सुचित केले आहे. राज्यातील नागरिकांनाही याचा फायदा व्हावा आणि आरोग्य यंत्रणेला मदत व्हावी या हेतून राज्याच्या आरोग्य विभागाने हे राज्यातील कोरोना बाधित रूग्ण, दवाखाण्यातून या रोगातून बरे झालेले नागरिक तसेच संशयितांचे मोबाईल क्रमांक एकत्र करण्याच्या सुचना यंत्रणेला दिल्या आहेत.
कोव्हीड १९ झालेले रूग्ण, विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले रूग्ण, सर्व संशयित बाधित रूग्ण, रूग्णालयातून डिस्चार्ज मिळालेले बाधा मुक्त नागरिक, आरोग्य सेवा देणारे डॉक्टर्स आणि परिचारीका तसेच सर्व यंत्रणेने हे अॅप जनहितार्थ डाऊनलोड करण्याच्या सुचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
-----
चौकट
आरोग्य सेतू अॅप असे करते कार्य
आरोग्य सेतू अॅप हे ओएएस आणि अॅड्रोईड या दोन्ही आॅपरेटिंग सिस्टीमवर कार्य करते. देशातील ११ भाषांमध्ये हे अॅप विकसीत करण्यात आले आहे. ब्लूटूथ तंत्रज्ञानावर हे अॅप कार्य करते. कोरोना बाधित रूग्णाने या अॅपमध्ये माहिती भरली असल्यास संबंधित रूग्णांच्या मोबाईल कमांकावरून संकलित केलेल्या माहितीच्या आधारे जीपीएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाधित रूग्ण आसपास असल्यास त्याची धोक्याची सुचना हे अॅप देते. या सोबतच या अॅपमध्ये कोरोना रोगाची सर्व माहिती आहे. अॅप वापरणारा व्यक्तीला या रोगाबद्दल सर्व माहिती या अॅप द्वारे मिळवता येते. एखाद्या अॅप वापरकर्त्याला त्याच्यात कोरोना विषाणूची लक्षणे आढळल्यास टोल फ्री क्रमांकासोबर उपचार घेण्यासाठी जवळच्या कोव्हीड तपासणी केंद्राचीही माहिती देते.
कोट
लॉकडाऊन असतांनाही अनेक नागरिक रस्त्यावर येऊन त्याचा भंग करत आहेत. अशा घटना घडत असतील तर त्याची माहिती या अॅप द्वारे प्रशासकीय यंत्रणेला करता येण्याची सोय यात हवी. या सोबतच जवळच्या कोव्हीड तपासणी केंद्राची माहितीही नागरिकांना या अॅपद्वारे लवकर मिळाल्यास याचा फायदा नागरिकांना होईल.
डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष इंडीयन मेडीकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य