Corona Virus Vaccine : पुणे महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाकरिता ३१ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 11:56 AM2020-11-06T11:56:44+5:302020-11-06T11:57:45+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यांत शहरात सुमारे ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे.
पुणे : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देषानुसार, पुणे महापालिकेने शहरातील सरकारी व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती संकलनाचे काम सुरू केले आहे. आत्तापर्यंत ३१ हजार ७२१ आरोग्य कर्मचाऱ्यांनी महापालिकेकडे अर्ज सादर केले आहेत.
पालिकेच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. वैषाली जाधव यांनी याबाबत माहिती दिली. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यांत शहरात सुमारे ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येणार आहे.यात कोरोनाबाधितांवर उपचार करणारे सरकारी, खासगी क्षेत्रातील डॉक्टर, परिचारिका व अधिक्षक, आरोग्य अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, सहायक आरोग्य कर्मचारी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लशीच्या वितरणाचे नियोजन सुरू केले आहे. त्यात लसीकरणासाठी प्राधान्यक्रम ठरविला असून, यामध्ये प्रत्येक राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या नियोजनासाठी नुकतीच महापालिकेच्या क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. यात शहरातील खासगी रुग्णालये व जनरल प्रॅक्टिशनरना त्यांची माहिती पाठविण्यासाठी पत्रे दिली आहेत. त्यानुसार डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्य सरकारकडे आलेली माहिती पाठविण्यात येणार असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.