Corona virus Vaccine : पुण्यात 'केईएम'मध्येही 'कोव्हिशिल्ड’लसीच्या मानवी चाचणीला सुरूवात; दोघांना दिला पहिला डोस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 07:19 PM2020-08-27T19:19:56+5:302020-08-27T19:22:23+5:30
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ ही लस विकसित केली जात आहे..
पुणे : भारती हॉस्पीटलपाठोपाठ पुण्यात केईएम रुग्णालयाच्या वढू येथील संशोधन केंद्रातही 'कोव्हिशिल्ड’ या कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीस गुरूवारपासून सुरूवात झाली. दोन स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. या केंद्रामध्ये महिनाभरात १५० ते २०० जणांना लस दिली जाणार आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ ही लस विकसित केली जात आहे. या लसीच्या भारतातील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीची जबाबदारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटवर सोपविण्यात आली आहे. या संस्थेकडून लसीचे उत्पादनही केले जाणार आहे. भारती हॉस्पीटलमध्ये दोन स्वयंसेवकांना लसीचा पहिला डोस देऊन बुधवारी मानवी चाचणीला सुरूवात करण्यात आली. त्यानंतर गुरूवारी केईम रुग्णालयाच्या वढू येथील संशोधन केंद्रात दोघांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. पुढील सात दिवस त्यांच्या आरोग्यविषयक तक्रारींचा पाठपुरावा केला जाणार आहे. त्यानंतर महिनाभराने त्यांना दुसरा डोस दिला जाईल.
याविषयी माहिती देताना केईएम संशोधन केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. आशिष बावडेकर म्हणाले, बुधवारी पाच जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये दोघे जण लस देण्यासाठी पात्र ठरल्यानंतर गुरूवारी पहिला डोस देण्यात आला. केंद्रामध्ये १५० ते २०० जणांना लस दिली जाणार आहे. पुढील महिनाभरात लस देण्याचे काम पुर्ण होईल. लसीचा पहिला डोस दिल्यापासून पुढील सहा महिने सर्व स्वयंसेवकांचा आरोग्यविषयक पाठपुरावा केला जाईल.
-------------------------