Corona virus : कोरोनाच्या धास्तीने परगावच्या पाहुण्यांवर गावांमध्ये घरबंदीची सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 05:11 PM2020-03-26T17:11:05+5:302020-03-26T17:16:43+5:30
शहरांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊ लागल्याने तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने गेल्या आठ-दहा दिवसांत शहरांकडून गावांकडे स्थलांतर वाढले.
पुणे : गेल्या काही दिवसांत पुण्यासह मुंबई व अन्य शहरांमधून आलेला सर्व नागरिकांना सक्तीने घरबंदी (होम क्वारंटाईन) करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात कोणत्याही स्पष्ट सूचना नसल्यातरी गावोगावचे ग्रामस्थच आता सजग झाले आहेत. परगावाहून कोणीही नागरिक आला, की त्याला घराबाहेर न पडण्याची सक्ती केली जात आहे. यामुळे क्वचित ठिकाणी वादंगाचेही प्रसंग निर्माण होताना दिसत आहेत.
पुणे, मुंबई तसेच विदेशातून येणाऱ्या पाहुण्यांना या घरबंदीचा सामना करावा लागतो आहे. अद्याप अनेक गावांमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलेले नाही. या पार्श्वभूमीवर परगावाहून येणाऱ्या कोणामुळे गावात हा विषाणू येऊ नये, यासाठी गावकरी प्रयत्नशील असल्याचे दिसते. शहरांमध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे होऊ लागल्याने तसेच कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने गेल्या आठ-दहा दिवसांत शहरांकडून गावांकडे स्थलांतर वाढले आहे. या पार्श्वभूमीवर 'शहरांमधून आलेल्या नागरिकांमुळे गावांवर कोरोनाचे संकट' हे वृत्त 'लोकमत'ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने विविध उपाय-योजना करण्याचे आदेश सर्व ग्रामपंचायतींना दिले.
सध्या पुणे जिल्ह्यातील बहुतेक सर्व गावांमध्ये शेकडो शहरी नागरिक आपल्या संपूर्ण कुटुंबासह वास्तव्यास आले आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. तचेस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी किमान एकविस घराबाहेर न पडण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. परंतु त्यानंतर देखील ग्रामीण भागात गावांमधील गर्दी अपेक्षित प्रमाणात कमी होताना दिसत नाही. तसेच शहरांमधून आलेल्या नागरिकांचा मुक्तसंचार अधिक आहे. शिरूर तालुक्यातील कोरेगावमध्ये एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण सापडल्यानंतर गावांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
त्यामुळे अनेक गावांनी आपल्या गावांची वेशी बंद केल्या आहेत. प्रत्येक गावात आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करत आहेत. यामध्ये पुणे , मुंबईसह अन्य शहरांमधून आलेल्या लोकांच्या हातावर 'होम क्वारन्टाईन'चे शिक्के मारले जात आहेत. आजारी व ज्येष्ठ नागरिकांचा डेटा गोळा केला जात आहे. त्यामुळे शहरांप्रमाणेच गावांमध्येही संचारबंदी पाळावी लागेल एवढेच नव्हे तर, 'होम क्वारन्टाईन'चाही शिक्का स्विकारावा लागेल, अशी परिस्थिती शहरांकडून गावांकडे जाणाऱ्या पाहुण्यांवर आहे.
-----------------------