Corona virus : पुण्यात व्हेंटिलेटरसाठी वेटिंग : ४८० रूग्णांवर उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:27 PM2020-09-08T13:27:17+5:302020-09-08T13:29:34+5:30
पुणे महापालिका हद्दीत कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचारासाठी सर्व मिळून ६ हजार ५३७ बेड विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.
पुणे : महापालिका, ससून हॉस्पिटलसह शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील महापालिकेने ज्या खाटा कोविड-१९ च्या रूग्णांवरील उपचारासाठी आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी एकाही ठिकाणी सद्यस्थितीला व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. महापालिकेचे नियंत्रण असलेल्या या सर्व ४८० व्हेंटिलेटरवर सध्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ च्या करिता उपलब्ध करून दिलेल्या डॅशबोर्डवर शहरातील विविध हॉस्पिटलमधील (पुणे महापालिका हद्दीतील) ७ हजार ९९४ एकूण बेड क्षमता दाखविण्यात आली आहे. प्रत्यक्षात यापैकी ४ हजार ८६९ बेड कोविड-१९ च्या रूग्णांसाठी खाजगी हॉस्पिटलने दिलेले आहेत. तर उर्वरित बेड हे महापालिकेच्या हॉस्पिटल व ससून हॉस्पिटलमधील आहेत.
पुणे महापालिका हद्दीत कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचारासाठी सर्व मिळून ६ हजार ५३७ बेड विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत २ हजार २४७ आयसोलेशन बेडपैकी ९०२ बेड रिक्त होते. ४४४ आयसीयु बेडपैकी केवळ १२ बेड रिक्त होते. तर महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८० व्हेंटिलेटर बेडवर रूग्णांवर उपचार सुरू होते़ तसेच ३ हजार ३६६ ऑक्सिजन बेडपैकी केवळ ७३ बेड रिक्त होते.
-------------
पुणे शहरातील बहुतांशी कोविड-१९ च्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडवर रूग्णांवर उपचार चालू असल्याने नव्याने आढळून येणाऱ्या रूग्णांना तात्काळ वरिल बेडची आवश्यकता असल्याचे ते सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठे हाल सध्या सुरू आहेत. यामुळे लक्षणे दिसून येणाऱ्या किंवा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अर्धा तासापेक्षा जास्त संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लागलीच तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
-----------------------
तीन हॉस्पिटल महापालिका ताब्यात घेणार
शहरातील जनरल बेड वगळता ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील तीन खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेतला आहे. यानुसार इनामदार हॉस्पिटल कोंढवा, केईएम हॉस्पिटल, सहयाद्री हॉस्पिटल कोविड-१९ च्या रूग्णांसाठी ताब्यात घेण्यात येणार असून, यामुळे साधारणत: अडीचशे बेडची आणखी वाढ रूग्णांसाठी शहरात होणार आहे़.