Corona virus : अजून आम्ही थकलो नाही..कारण अजून आम्ही कोरोनाविरुद्ध जिंकलेलो नाही..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 05:04 PM2020-04-30T17:04:22+5:302020-04-30T17:05:15+5:30
रेड झोनमधील पोलिसांचे रिपोर्ट निगेटिव्ह; पुन्हा कर्तव्यावर हजर
पुणे : कोरोना विषाणूने पुणे शहरातील काही भागात थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद प्रमाण मानून पोलीस अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेल्या हद्दीत नाकाबंदी करीत कर्तव्य करीत आहेत, मात्र जीव धोक्यात घालून 'रेड झोन' मध्ये कर्तव्य बजावणाऱ्या १५ पोलिस कर्मचाऱ्यांची सिंहगड रस्त्यावरील महापालिकेच्या लायगुडे दवाखान्यात (कोवीड केअर सेंटर) घशातील द्रव घेऊन तपासणी करण्यात आली. त्या पंधराही जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर ते पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. दरम्यान दवाखान्यातून कर्तव्यावर हजर राहण्यासाठी जाणाऱ्या पोलिसांना उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून मानवंदना दिली.
चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले असून त्याने आता भारतातही शिरकाव केलेला आहे. या जीवघेण्या विषाणूच्या आजाराची लक्षणं असलेले रुग्ण पुण्यातही रोजच आढळून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, पोलिसही नागरिकांनी घराबाहेर पडू नये म्हणून प्रत्येक पावले उचलत आहेत, जेणेकरुन संसर्ग पूर्णपणे टाळता येईल. आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच जीव धोक्यात घालून पोलीस रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांना घरीच बसण्याचे आवाहन करीत आहेत. शहरातील रेड झोनमधील नाकाबंदीदरम्यान कोरोनाबाधित रुग्णांशी अथवा संशयित व्यक्तींशी पोलिसांचा थेट संपर्क होत असल्याने झोन तीनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी दत्तवाडी व पर्वती विभागातील १५ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोवीड ची चाचणी करण्यासाठी त्यांना सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यात दाखल करून त्यांच्या घशातील द्रव घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर लगेचच सर्व कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर हजर राहण्यासाठी गेले. दरम्यान त्यांना दवाखान्यातून निरोप देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी शाह व औषध निर्माण अधिकारी कल्पेश घोलप यांनी कम्युनिटीमध्ये काम करताना पोलिसांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन केले.
................................
पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना..
कोरोना व्हायरसमुळे सध्या महाराष्ट्र पोलीस महत्वाच्या चौकात, रस्त्यावर नाकाबंदी करून नागरिकांची चौकशी करून मगच त्यांना सोडत आहेत. नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहावे, तसेच त्यांना कोरोना विषाणूपासून रोखण्यासाठीच सध्या पोलीस रस्त्यावर उतरले आहोत. शहरातील काही पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने एका पोलीस ठाण्यातील संपूर्ण स्टाफ नुकताच क्वारंटाईन करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाने पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेत हॉस्पिटलमधील काही बेड पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.तसेच नाकाबंदीदरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.