Corona virus : 'काय म्हणायचं यांना'; मास्क कुठे तर खिशात, अन् रस्त्यावर मात्र तोंड उघडे ठेऊन फिरतात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 05:08 PM2020-07-08T17:08:25+5:302020-07-08T21:03:37+5:30
मास्क असूनही न घालता शहरात फिरणाऱ्या ७७८ जणांवर कारवाई
पुणे : शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेक जण केवळ दाखविण्यापुरता मास्क स्वत: जवळ ठेवतात. प्रत्यक्ष तो तोंडाला न लावता फिरणाऱ्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.गेल्या ५ दिवसात शहर पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या ७७८ जणांवर पोलिसांनी कारवाई केली. हे केवळ पोलिसांना आढळून आलेले लोक आहेत.
शहरात कोणतेही ठोस कारण नसतानाही पायी फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशा ९०१ विनाकारण पायी फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करुन गुन्हे दाखल केले आहेत. याबरोबरच विनाकारण वाहनांवरुन फिरणाऱ्या ३३६ जणांवर कारवाई केली असून २६२ वाहने ३ ते ७ जुलै दरम्यान जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय ट्रिपल सीट जाणाऱ्यांवर १०७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात यापुढे ही कारवाई आणखी तीव्र होणार आहे.लोकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कारण नसताना घराबाहेर फिरु नये़ स्वत:ची व इतरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त बच्चनसिंग यांनी केले आहे.
येरवडा पोलिसांनी येरवडा व कल्याणीनगर परिसरात मंगळवारी अचानक तपासणी सुरु केली. त्यात अनेक जण मास्क बरोबर असतानाही मास्क न लावता जाता येताना आढळून आले तर काही जणांकडे मास्कही नसल्याचे आढळून आले. अशा २४ जणांवर येरवडा पोलिसांनी कारवाई केली.
...........
गेल्या ४ दिवसात नियमभंग केल्याने वेगवेगळ्या कलमाखाली पुणे शहरात तब्बल एकूण २ हजार ४३२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ आता पुणेकरांनी स्वत: वैयक्तिक रित्या शिस्तीचे पालन करण्याची वेळ आली आहे़ लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुरु राहिल़
डॉ. के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे़
..............................................................
३ ते ७ जुलै दरम्यान पोलिसांनी केलेली कारवाई
मास्क न घालता फिरणारे ७७८
विनाकारण पायी फिरणारे ९०१
विनाकारण वाहनांवरुन फिरणारे ३३६
वाहने जप्त २६२
मयार्देपेक्षा अधिक प्रवासी असणारी वाहने १०७
निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ दुकाने ४५
फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणारी दुकाने ३
......