Corona virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सेनापती वाढले पण आता सैनिक कधी वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 11:52 PM2020-08-22T23:52:06+5:302020-08-22T23:55:00+5:30
कोरोना काळात मनुष्यबळाची वानवा
पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पालिकेने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना केल्या. पुणे महापालिकेच्या मदतीकरिता राज्य शासनाने अर्धा डझनपेक्षा अधिक ‘आयएएस’ अधिकाऱ्यांची फौज पाठविली. एकीकडे या सेनापतींची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे प्रत्यक्ष ‘ग्राऊंड’वर लढत असलेल्या सैनिकांची संख्या मात्र तेवढीच आहे.
कोरोनाच्या काळात रस्ते झाडणारे, स्वच्छतागृहे स्वच्छ करणारे तसेच सार्वजनिक स्वच्छता करणारे सफाई कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. येरवडा, भवानी पेठेसारख्या अगदी दाटीवाटीच्या भागातही या सेवकांनी आपली सेवा खंडीत होऊ दिली नाही. आपले कर्तव्य बजावित असताना शेकडो स्वच्छता कर्मचारी कोरोनाबाधित झाले. तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. या कर्मचा-यांच्या नातेवाईकांना हक्काच्या विम्याच्या पैशांसाठी प्रशासनाकडे डोळे लावून बसायला लागत आहे.
वर्ग एक ते वर्ग चारमधील एकूण 8 हजार कर्मचारी सध्या कोरोनाच्या ड्युटीवर लावण्यात आलेले आहेत. यामध्ये शिक्षण मंडळ, पीएमपीएमएल, शासन आणि कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर्सचा समावेश आहे. पोलिसांनी नेमलेल्या विशेष पोलीस अधिकारी आणि स्वयंसेवक यांची संख्याही त्यामध्ये समाविष्ठ आहे. या सर्वांची संख्या 5 हजार 830 एवढी होत असून ही संख्या वजा केली तर पालिकेचे अवघे अडीच हजारांच्या आसपास मनुष्यबळ कोरोनाचे काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. पालिकेकडूनच ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांवरील ताण कमी करण्याकरिता वरिष्ठ अधिका-यांची संख्या वाढविण्यात आली. परंतू, प्रत्यक्ष ‘ग्राऊं ड’वर काम करणा-या शेवटच्या घटकावरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ कधी उपलब्ध होणार हा प्रश्न आहे.
=====
कोरोनाविषयक कामकाज असलेले अधिकारी-कर्मचारी
वर्ग संख्या
वर्ग 1 -79
वर्ग 2 -109
वर्ग 3 - 1,758
वर्ग 4- 360
शिक्षण मंडळ कर्मचारी 327
शिक्षिका/शिक्षक 486
पीएमपीएमएल कर्मचारी 2,898
शासनाकडील उपलब्ध सेवक 96
विशेष पोलीस अधिकारी 1,488
कंत्राटी डाटा एंट्री ऑपरेटर 51
स्वयंसेवक 484
एकूण 8,136