Corona virus : 'लवासा ’तील हॉस्पिटल, हॉटेल ताब्यात घ्या, तिथे 'कोविड सेंटर' सुरू करा : गिरीश बापट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:57 PM2020-07-30T17:57:47+5:302020-07-30T18:45:31+5:30
लवासा प्रकल्पातील रुग्णालये, हॉटेल ताब्यात घेण्याबाबत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप
पुणे : लवासामध्ये अद्ययावत असे रुग्णालय तयार आहे. त्याचप्रमाणे तिथे लोकवस्ती देखील कमी आहे. त्यामुळे लवासा हे कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे. तिथे कोविड रुग्णालय सुरू झाले तर मुळशी तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी थेट पुण्याला यावे लागणार नाही. प्रशासनाने मुळशी तालुक्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लवासामधील रुग्णालय व हॉटेलसह रिकाम्या इमारती ताब्यात घ्याव्यात आणि तिथे कोविड सेंटर सुरू करावे असे स्पष्ट मत पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. तसेच यासंबंधी आपण जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी पत्रव्यवहार केल्याचे देखील सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी पुणे दौऱ्यावर आले होते. तसेच त्यांच्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत कोरोना निर्मूलन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याच धर्तीवर बापटांनी ही मागणी केली आहे.
बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यासह मुळशी तालुक्यात देखील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. या सर्व रुग्णांना कोरोनावरील उपचारासाठी थेट पुण्याला यावे लागते.त्यामुळे इतर ठिकाणचे खासगी,शाळा, रुग्णालये ताब्यात घेण्यासाठी तत्परता दाखवणाऱ्या प्रशासनाने लवासामध्ये असलेले अद्ययावत रुग्णालय व हॉटेल व रिकाम्या इमारती देखील ताब्यात घ्याव्यात. या ठिकाणी असलेल्या अद्ययावत रुग्णालयामुळे वैद्यकीय यंत्रणेवर अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. तसेच डॉक्टर, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्यातर तात्काळ कोविड सेंटर उभे राहून तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक व गोर गरीब रुग्णांना त्याचा फायदा होईल. यासंबंधी प्रशासनाला पत्र लिहून त्वरित पावले उचलत कार्यवाही करण्याची मागणी केली असल्याचे बापट यांनी सांगितले.
मुळशी तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय असतानाही या परिसरातील लवासा प्रकल्पातील रुग्णालय, हॉटेल ताब्यात घेण्यात हयगय केली जात आहे. जिल्ह्यातील इतर खासगी रुग्णालयांच्या बाबतीत तातडीने निर्णय घेणारे प्रशासन लवासाकडे का दुर्लक्ष करत आहे, असा प्रश्न मुळशीकरांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
............
प्रशासनाची टोलवाटोलव
‘‘तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहून अधिग्रहण करता येतील अशा रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली आहे. यात ‘लवासा’तील हॉस्पिटलचा समावेश आहे. सध्या मनुष्यबळाची मोठी कमतरता असून, कमी कर्मचाऱ्याांमध्ये जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करण्याचे नियोजन आहे. यामुळेच सध्याच्या मोठ्या सुविधा कार्यान्वित झाल्यावर ‘लवासा’तील हॉस्पिटलचा विचार करण्यात येईल,’’ असे मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी सांगितले.