Corona virus : पुण्याहून उपचारासाठी गेलेली महिला निघाली कोरोनाबाधित; हवेली परिसरात भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 07:37 PM2020-05-04T19:37:34+5:302020-05-04T19:47:07+5:30
संबंधित कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात तब्बल २७ जण
कदमवाकवस्ती: कवडीपाट माळवाडी येथील मिळून आलेल्या तीन कोरोना बधितांपैकी एका महिलेच्या मृत्यूला तीन दिवस पूर्ण होत नाही तोच चौथा कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने कदमवाकवस्ती परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनतोय काय अशी परिस्थिती निर्माण होऊ लागलेली आहे. हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथे दोन दिवसांपूर्वी पुण्याहून उपचारासाठी आलेली एक ४५ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.
संबंधित महिलेच्या संपर्कात तब्बल २७ जण आले आहेत. त्यामध्ये तिच्या दोन जावयांचा समावेश आहे. त्यामुळे कदमवाकवस्ती परिसरात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकट्या कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागील चार दिवसात तब्बल चार जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
पुण्यातील लोहियानगर परिसरात राहणारी एक महिला मागील आठ दिवसांपासून आजारी आहे. पुण्यात पुरेसे उपचार न मिळाल्याने ती कदमवाकवस्ती परिसरात राहणा?्या दोन जावयांकडे तीन दिवसांपूर्वी राहण्यास आली होती. दोन दिवसांपूर्वी तिच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे जावयांनी तिला फुरसुंगी मार्गावरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे तिची रक्त तपासणी व एक्स रे काढून पुढील उपचारासाठी हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र, संबंधित रुग्णालयातील उपचार परवडणार नसल्याने तिला गोळीबार मैदान (पुणे) येथील शासकीय रुग्णालयात नेले. तेथे तपासणीत तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे रविवारी (दि. ३) रात्री अकरा वाजता निष्पन्न झाले.संबंधित महिला कोरोनाबाधीत असल्याचे निष्पन्न होताच कदमवाकवस्ती ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी महिलेचे जावई राहत असलेली वस्ती रविवारी (दि. ३) रात्री अकरा वाजता सील केली. तसेच वस्तीत निजंर्तुकीकरण केले. लोणी काळभोर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव यांनी कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आलेल्या दोन जावायांना तात्काळ कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्यातील शासकीय रुग्णालयात हलविले आहे.
याबाबत डॉ. जाधव यांनी माहिती दिली की, संबंधित महिलेच्या दोन जावयांसह तब्बल २७ जण संपर्कात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास महिलेचा कोरोनाचा रिपोर्ट मिळताच तिला उपचारासाठी विविध रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या दोघांना तत्काळ कोरोनाच्या टेस्टसाठी हलविले आहे. उर्वरित पंचवीस जणांनाही आज (सोमवारी) दुपारी पुण्यात नेण्यात येणार आहे. महिलेचे जावई राहत असलेल्या परिसरात घरोघरी जाऊन आशा सेविकांच्या माध्यमातून माहिती घेतली जाणार आहे.
...........
कदमवाकवस्ती येथील रुग्णालयात सापडलेली ४७ वर्षीय कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेले एक डॉक्टर व दोन नर्सनंतर नुकत्याच कवडीपाट येथील मृत पावलेली ७० वर्षीय महिला व तिच्या संपर्कात आलेले दोघेजण व आत्ता मिळून आलेल्या ४५ वर्षीय महिलेमुळे कदमवाकवस्ती मधील एकूण कोरोनाबधितचा आकडा ८ वर गेल्याने कदमवाकवस्ती गाव कोरोनाचा हॉटस्पॉट बनतो की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे