Corona virus : चिंताजनक ! पुणे शहरात शनिवारी ८२२ रुग्ण कोरोनाबधितांची भर, एकूण रुग्णसंख्या १५ हजार पार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:31 AM2020-06-28T00:31:36+5:302020-06-28T00:32:12+5:30
आजारातून बरे झालेल्यांची संख्या नऊ हजार ११९ वर
पुणे : शहरात शनिवारी आजवरची सर्वाधिक ८२२ रूग्णांची वाढ झाली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा १५ हजार ६०२ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ४८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३०८ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ५ हजार ८९२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शनिवारी रात्री साडे नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८२२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ५६१ तर खासगी रुग्णालयांमध्ये २५२ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३०८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ६५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २४३ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात शनिवारी १९ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५९१ झाली आहे. दिवसभरात एकूण ४८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील २९३ रुग्ण, ससूनमधील १२ तर खासगी रुग्णालयांमधील १८१ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ९ हजार ११९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ५ हजार ८९२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार २५५ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ७ हजार ३१० रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.