Corona virus : चिंताजनक! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि देशाच्या सरासरीपेक्षा ग्रामीण भागाचा मृत्यूदर अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 11:50 AM2020-09-10T11:50:27+5:302020-09-10T11:52:06+5:30
पुण्याच्या ग्रामीण भागातील वाढता मृत्यूदर धडकी भरवणारा.. आजार अंगावर काढण्याच्या सवयीचा परिणाम
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : ग्रामीण भागात अद्यापही कोरोना महामारी अनेक गैरसमज असून, आजार अंगावर काढण्याची सवय धोकादायक ठरत आहे. तसेच रुग्णांना वेळेवर उपचार उपलब्ध होत नाहीत. यामुळेच सध्या पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहरापेक्षा ग्रामीण भागातील वाढता मृत्यूदर सध्या प्रशासनासाठी चिंताजनक ठरत आहे. यामध्ये जुन्नर तालुक्यातील मृत्यूदर तर सर्वाधिक 4.71 टक्के असून, जिल्ह्यात सर्वाधिक हाॅटस्पाॅट असलेल्या व सर्वाधिक रुग्ण असलेल्या हवेली तालुक्यातील मृत्यूदर केवळ 1.85 ऐवढा आहे.
पुण्यासारख्या प्रगत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही आरोग्य सेवा-सुविधांच्या नावाने बोंब आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना महामारी येऊन सहा महिने लोटले आहेत. यामध्ये शहरी भागात उपचार मिळताना अडचणी येत असल्या तरी किमान वेळेत उपचार उपलब्ध तरी होत आहेत. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर निर्माण करण्यात आले आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या कोविड केअर सेंटरचा चांगला लाभ होत आहे. परंतु हाॅस्पिटलची गरज असणा-या, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स गरज असलेल्या आणि गंभीर रुग्णांना आजही बेड उपलब्ध होतांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात ग्रामीण भागात खेड्या-पाट्यामध्ये साधे डाॅक्टर देखील उपलब्ध नाहीत. यामुळेच काही लक्षणे दिसली तरी आजार अंगावर काढणे किंवा घरगुती उपचार करण्यावर अधिक भर दिला जातो. यामुळेच ग्रामीण भागात कोरोनाची लागण झाल्यानंतर चार-पाच अथवा रुग्ण गंभीर झाल्यानंतर हाॅस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षाअधिक आहे. या सर्वांचा परिणाम ग्रामीण भागातील मृत्यूदर देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा खूपच अधिक आहे.
ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या सोबतच मृत्यूदर देखील वाढत आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग असाच राहिला आणि रुग्णांना वेळेत उपचार उपलब्ध न झाल्यास मृत्यूदर आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच प्रशासनाने याबाबत वेळीच लक्ष न घातल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
-----
जिल्ह्याचा तालुकानिहाय मृत्यूदर (नगरपालिकासह)
तालुका मृत्यू टक्केवारी
आंबेगाव 45 3.41
बारामती 53 3.31
भोर 30 3.53
दौंड 56 3.28
हवेली 154 1.85
इंदापूर 43 4.50
जुन्नर 66 4.71
खेड 118 2.42
मावळ 124 3.79
मुळशी 50 2.77
पुरंदर 55 3.81
शिरूर 87 3.73
वेल्हा 10 3.64