Corona virus : कोरोनाच्या भीतीने येरवडा कारागृह ‘अलर्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 08:32 PM2020-03-20T20:32:17+5:302020-03-20T20:37:20+5:30
आरोपींना भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना बंदी
पुणे : देशभर कोरोनाने सर्वांची झोप उडविली असताना राज्यात दिवसागणिक या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. यामुळे आरोग्य प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच कैद्यांनादेखील कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी येरवडा कारागृहाने विशेष काळजी घेतली आहे. त्यात त्यांनी आता कैद्यांची आरोग्य तपासणी, केवळ कैदीच नव्हे, तर पोलीस कर्मचाऱ्यांनाही ‘स्क्रीनिंग’ अनिवार्य केली आहे.
सध्या राज्यभरातील कारागृहांमध्ये सुरू असणारे विविध वस्तूंच्या उत्पादनाचे काम थांबण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आरोपींना भेटीसाठी येणाऱ्या नातेवाईकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकारची खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यातल्या वेगवेगळ्या भागांतून कोरोनाचा संसर्गबाधित रुग्ण आढळून आल्याने कारागृह प्रशासनाकडून काळजी घेण्यात येत आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाच हजारांपेक्षा जास्त तर खुले कारागृहात १५० हून अधिक बंदी आहेत. राज्यातील विविध कारागृहांमध्ये घेण्यात आलेल्या सुरक्षेविषयी अधिक माहिती देताना कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले, की कारागृहांमधील वेगवेगळ्या वस्तूंचे उत्पादन आता बंद करण्यात आले आहे. दररोज कारागृहात येणाºया कैद्यांची संख्या लक्षात घेता नवीन कैद्यांपासून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक कारागृहातील प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या कैदीची आरोग्य तपासणी करणे अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय कारागृहातील पोलीस कर्मचाºयांनीदेखील आपले स्क्रीनिंग करून घेणे गरजेचे आहे. नवीन आलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवणे एखाद्या कैद्यांत वेगळी लक्षणे दिसून आल्यास तातडीने आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आदेश दिले आहेत.
कैद्यांना हातपाय धुण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. साबणाने हातपाय धुवावेत, असे त्यांना सांगण्यात आले आहे. कारागृहातील मुलाखत कक्षामध्ये दररोज ४५० पेक्षा अधिक कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईक गर्दी करतात. अशा वेळी कैद्यांना त्यांच्यापासून कुठल्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. राज्यातील एकूण ५४ कारागृहांमधील ३२ हजारांपेक्षा जास्त असलेल्या कैद्यांच्या तुलनेत दोन तृतीयांश कच्चे कैदी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येवर असलेल्या कैद्यांच्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जामीन मिळावा, यासाठी कच्च्या कैद्यांची माहिती जमवण्याचे काम सुरू असल्याचेही देसाई यांनी सांगितले.
* येरवडा कारागृहातदेखील चप्पल, बूट, कपडे, लाकडी वस्तू, शोभेच्या वस्तू यांसारख्या विविध वस्तू तयार करणारे कारखाने आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी येरवडा मध्यवर्ती कारागृह प्रशासनानेदेखील काळजी घेतली आहे. सध्या या कारागृहात ५९०० पुरुष कैदी बंदिस्त आहेत.
०००