कोरोना योद्ध्यांना लवकरच मिळणार विम्याची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:14+5:302020-12-22T04:10:14+5:30
पुणे : कोरोना काळात कर्तव्य बजावित असताना या आजारामुळे प्राण गमवाव्या लागलेल्या पालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांच्या विम्याची रक्कम लवकरच दिली जाणार ...
पुणे : कोरोना काळात कर्तव्य बजावित असताना या आजारामुळे प्राण गमवाव्या लागलेल्या पालिकेच्या अधिकारी-कर्मचा-यांच्या विम्याची रक्कम लवकरच दिली जाणार आहे. यातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरु असून यासंदर्भात स्थायी समितीला ठराव देण्यात आला आहे. त्यानंतर, एकूण ४४ लोकांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पालिकेच्या कर्मचा-यांना ५० लाख रुपयांपर्यंतचा विमा लाभ देण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता. यासोबतच राज्य शासनानेही ५० लाखांचा विमा जाहिर केला होता. शासनाने लॉकडाऊनचा सुरुवातीचा कालावधी ३० सप्टेंबरपर्यंत निश्चित केलेला होता. त्यामुळे या तारखेपर्यंत मृत्यू झालेल्या १५ कर्मचा-यांच्या विम्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार करुन दिला. परंतु, लॉकडाऊनचा कालावधी शासनाने वाढवित नेला. कोरोना ड्युटीवर असलेल्या अनेक कर्मचा-यांना त्यानंतर कोरोनाची लागण झाली. यामध्ये आणखी २९ जणांना प्राण गमवावे लागले. ही एकूण संख्या ४४ झाली आहे.
दरम्यान, प्रशासनाने कुटुंबातील एकास नोकरी आणि २५ लाख रुपये विमा रक्कम देण्याची तयारी दर्शविली. प्रशासनाने १५ कर्मचा-यांचा प्रस्ताव तयार केलेला असल्याने उर्वरीत २९ जणांचे काय करायचे असा पेच निर्माण झाला होता. या सर्वांच्या कुटुंबियांना विम्याचा लाभ दिला जावा अशी भूमिका महापौर मोहोळ यांनी घेतली. तसा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून हा प्रस्ताव स्थायी समोर ठेवण्यात आला आहे. या ठरावाला मंगळवारी होणा-या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मुख्य सभा मान्यता देईल या भरवशावर मंजुरी मिळाल्यानंतर एक आठवड्यात मृतांच्या नातेवाईकांना विम्याचे धनादेश देण्यात येणार असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.