कोरोनाची लस आली खरं... पण तिची गरज कोणाला? कशासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:32+5:302021-01-16T04:14:32+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी साथ संपलेली नाही. दुसरी लाट येणारच ...
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी साथ संपलेली नाही. दुसरी लाट येणारच नाही, असे सध्या कोणत्याही कोणत्याही वैद्यकीय तज्ज्ञांनी किंवा संशोधकांनी ठामपणे सांगितलेले नाही. त्यामुळे लस टोचून घेणे हाच सध्याचा रामबाण उपाय ठरणार आहे. लस अत्यंत प्रभावी आणि परिणामकारक आहे,” असे स्पष्ट मत भारती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ. संजय ललवाणी यांनी व्यक्त केले.
अकरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कोविड-१९ लस आली आहे. कोविशिल्ड (सिरम) आणि कोव्हँक्सिन (भारत बायोटेक) या दोन लसी टोचण्याचा पहिला टप्पा शनिवार (दि. १६) पासून देशात सुरू होतो आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटल आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल या ठिकाणी कोविशिल्ड या लसीच्या मानवी चाचण्या अनुक्रमे डॉ. ललवाणी आणि संचालक डॉ. विजय नटराजन यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडल्या.
प्रश्न : लस कोणाकोणाला दिली जाणार आहे?
-लसीच्या मानवी चाचण्या सुरू असताना स्वयंसेवकांच्या आरटीपीसीआर आणि अँटिबॉडी टेस्ट करण्यात आल्या होत्या. आता सार्वजनिक स्तरावर लसीकरण करताना प्रत्येकाची चाचणी करणे शक्य होणार नाही. मात्र, लसीची परिणामकारकता सिध्द झालेली असल्याने त्यात कोणतीही जोखीम नाही. सरकारतर्फे देशभरात ३ हजार केंद्रांवर लसीकरण होणार आहे. पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर शंभर जणांना लस दिली जात आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी देशभरच्या ३ लाख भारतीयांचे लसीकरण होईल.
प्रश्न : कोरोना झालेला असताना लस घेतल्यास त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
- एखाद्या व्यक्ती कोरोनाबाधित असेल आणि त्याबाबतची कल्पना त्याला नसेल तर लस घेतल्यावर फारसा प्रभाव दिसणार नाही. कारण, त्याच्या शरीरात आधीच कोरोना विषाणूचा शिरकाव झालेला असेल. लस दिल्यानंतर प्रतिकारशक्ती तयार व्हायला १४ दिवस लागतात.
प्रश्न : लसीकरणानंतर कोणते दुष्परिणाम दिसू शकतात?
- भारती हॉस्पिटलमध्ये मानवी चाचण्यांमध्ये १४० डोस देण्यात आले. हात दुखणे, ताप येणे, अंग दुखणे याव्यतिरिक्त कोणतेही दुष्परिणाम आढळले नाहीत. कोणतीही लस दिल्यावर काही ‘अॅलर्जिक रिअॅक्शन’ दिसत आहे का, यासाठी अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. एखादी ‘इमर्जन्सी’ उद्भवल्यास त्यासाठीही यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
प्रश्न : कोरोनाबाबतची सामान्यांमधील भीती कमी झालेली आहे. अशा वेळी लसीकरणाबाबत मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. त्याबद्दल काय सांगाल?
-कोविड-१९ विषाणू अजून पूर्णपणे गेलेला नाही. ब्रिटनमध्ये सध्या परिस्थिती वाईट आहे. आपल्याकडे दुसरी लाट येणारच नाही, असे सांगता येत नाही. लस उपलब्ध झालेली आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आलेले नाहीत. लस घेतल्यानंतर कोरोना विषाणूने गाठले तरी त्याचे परिणाम गंभीर असणार नाहीत. रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागणार नाही. ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटर लावण्याची पाळी येणार नाही, हेच लशीचे मोठे यश आहे. त्यामुळे लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. भीती कोरोनाची नसून, कोरोनामुळे दगावण्याची आहे. ही दहशत लसीकरणामुळे नाहीशी होणार आहे.
* कोरोनावरील फायझरच्या लसीमुळे युरोपातील नॉर्वेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी नुकतीच आली आहे. त्यामुळे आपल्याकडच्या लसीची भीती वाटेल का?
- नॉर्वेमध्ये ज्या लोकांना लस दिली गेली त्यापैैकी अनेक जण पूर्वीपासूनच अन्य काही आजारांचा सामना करत होते. एखाद्याला नैैसर्गिकरित्या काही आजार असेल, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येणार असेल, तर लस दिल्यानंतरही नैैसर्गिक आजार रोखता येत नाहीत. त्याच्या आधीच्या आजाराचा अथवा त्यामुळे आलेल्या मृत्यूचा संबंध कोरोना लसीकरणाशी जोडता येत नाही. कोव्हिशिल्ड लस अत्यंत सुरक्षित आणि परिणामकारक आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी या लसीचा उपयोग होणार आहे.
चौकट
लस म्हणजे औैषध नव्हे!
“लसीकरणामध्ये चार आठवड्यांच्या अंतराने दोन डोस दिले जातात. पहिल्या डोसनंतर सहा आठवड्यांनी किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यांनी प्रतिकारशक्ती पूर्णपणे तयार होते. हा काळ पूर्ण होईपर्यंत लसीकरण झालेल्या व्यक्तीला कोरोना होणार नाही किंवा त्याच्याकडून इतरांना संसर्ग होणार नाही, हा गैैरसमज आहे. लसीतून मिळणारे संरक्षण पाच-दहा वर्षांसाठी असेल की आयुष्यभरासाठी असेल, याबाबत अजून स्पष्टता नाही. लस टोचल्यानंतर शरीरात अँटिबॉडी विकसित होतात. या अँटिबॉडी किती काळ टिकतात, हे अद्याप सिध्द झालेले नाही. त्यामुळे लसीकरण झाल्यानंतरही सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे.”
- डॉ. विजय नटराजन, संचालक, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल