पुण्यातल्या बाळगोपाळांनी उलथवली कोरोना लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:13 AM2021-08-22T04:13:34+5:302021-08-22T04:13:34+5:30
मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण घटले : तिसऱ्या लाट लहानग्यांना भोवण्याचे आहे भाकीत नीलेश राऊत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ...
मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण घटले : तिसऱ्या लाट लहानग्यांना भोवण्याचे आहे भाकीत
नीलेश राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाच्या पहिल्या व तिसऱ्या लाटेच्या तुलनात्मक अभ्यासावरून, पुण्यात मुले कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण घटत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ० ते १८ वयोगटातील बाधित मुलांची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दीड टक्क्यानी घटली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोक्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र त्याआधीच पुण्यातल्या बाळगोपाळांनी कोरोना लाटेचा चांगला प्रतिकार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
पहिल्या लाटेत शहरातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ७२ हजार २९७ इतकी होती. यापैकी १९ हजार ५२० बाधित हे ० ते १८ वयोगटातील मुले होती. एकूण बाधितांच्या तुलनेत ही टक्केवारी ११.३३ टक्के होती. उपचाराअंती पूर्ण बरे झालेल्यांची संख्या यात १९ हजार ४९३ इतकी होती. तर या काळात २७ मुलांचा मृत्यू झाला. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याचे प्रमाण पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिकच राहिले. यात कोरोनामुक्तीचे प्रमाणही त्या तुलनेत जास्त होते.
दुसऱ्या लाटेत शहरात एकूण २ लाख ८८ हजार ३०६ जण बाधित झाले. यापैकी २८ हजार ४८२ बाधित हे ० ते १८ वयोगटातील मुले होती. एकूण बाधितांच्या तुलनेत ही टक्केवारी ९.८८ टक्के आहे. तर उपचाराअंती पूर्ण बरे झालेल्या मुलांची संख्या २८ हजार १६५ इतकी असून. दुसऱ्या लाटेत २५ मुलांचा मृत्यू झाला. शहरात पहिल्या लाटेत या वयोगटातील मृत्यूदर ०.१४ टक्के होता. तोच दुसऱ्या लाटेत ०.०९ टक्के इतका खाली आला. सध्या शहरातील विविध रुग्णालयांत १८ लहान मुलांवर उपचार चालू असून शहरातील सक्रिय कोराेनाबाधितांची संख्या २९२ इतकी आहे.