कोरोना तपासणीसाठी नवीन प्रयोगशाळा उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:17 AM2021-02-23T04:17:58+5:302021-02-23T04:17:58+5:30
पुणे : पुण्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या दृष्टीने ससून ...
पुणे : पुण्यात गेल्या आठवड्याभरात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन नियोजन करण्याच्या दृष्टीने ससून सर्वोपचार रुग्णालयात सोमवारी आढावा बैठक पार पडली. त्यात ससूनमधील कोरोना तपासण्यांची संख्या वाढवण्यासाठी नवीन प्रयोगशाळा उभारण्याच्या दृष्टीने ४१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, सर्व विभागप्रमुख यांच्यासह कोरोना कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वी जिल्ह्यातील आणि शहरातील १०० डॉक्टरांचे प्रशिक्षण पार पडले. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. डीसीएच, सीसीएच डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी नियोजन सुरु आहे. तसेच, मनुष्यबळ वाढवण्यासाठी राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीकडे औषध खरेदीसाठी ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. बैठकीय या सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
डॉ. मुरलीधर तांबे म्हणाले, ‘जिल्हाधिकाऱ्यांनी वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ससून सर्वोपचार रुग्णालयाला भेट दिली. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिल्यास कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, याबाबत चर्चा झाली. ससूनमधील कोरोना चाचण्यांची संख्याही लवकरच वाढवली जाणार आहे.’