इंदापूरात कोरोनासंख्या पुन्हा वाढण्यास सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:12 AM2021-08-01T04:12:01+5:302021-08-01T04:12:01+5:30
---------------- कळस : इंदापुर तालुक्यात सध्या गेली एक आठवड्यापासुन कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे प्रशासन व पदाधिकारी यांचा ...
----------------
कळस : इंदापुर तालुक्यात सध्या गेली एक आठवड्यापासुन कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे प्रशासन व पदाधिकारी यांचा नियोजनाच्या अभावामुळे तालुका पुन्हा अडचणीत आला आहे. दैनंदिन २० पेक्षा कमी झालेली रुग्णसंख्या पुन्हा आज ६३ पर्यंत गेली आहे, तालुक्यात आतापर्यंत ४२८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे मात्र तालुक्यात पदाधिकारी कोरोना योद्धा म्हणुन स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त आहेत, त्यामुळे सामान्य नागरीकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोना वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे शुक्रवारी तालुक्यात तब्बल ६३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मात्र प्रशासन याबाबत सतर्क नाही. सामान्य नागरिकांना नेहमीच दोषी ठरविले जाते. तालुक्यात मागील आठवड्यात २५ जुलै रोजी असणारी २१ रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होवून ३० जुलै रोजी ६३ पर्यंत पोहोचली आहे, ही बाब गंभीर आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने सतर्क राहून काम करणे गरजेचे आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये रुग्ण सापडत आहेत. ग्रामीण भागातही संख्या वाढत असून शहरात रूग्ण संख्या मोठी आहे. आतापर्यंत ग्रामीण मध्ये ३६३ मृत्यू झाले आहेत तर शहरात ५५ मृत्यू झाले आहेत. तालुक्यात एकूण ४२८ मृत्यू झाले आहेत. नगरपरिषद, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन यांनी नागरिकांच्या आरोग्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे.
--
चौकट
राजकीय पदाधिकारी सोयीप्रमाणे बैठका घेऊन आदेश देत आहेत मात्र, तालुक्याचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडे असल्याने निर्णय प्रकियेमुळे कोरोनाला रोखण्यात अपयश येत आहे. तालुक्यात कोरोना रुग्णामध्ये मोठी वाढ होत आहे. तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी, सध्या गेली काही महिन्यांपासून प्रभारी आहेत. नियोजन व खबरदारी उपाय योजनांसाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी समन्वय साधून मार्ग काढण्याची गरज आहे. तालुक्यामध्ये कोरोना लक्षणे आढळल्यास नागरीकांनी विलगीकरण झाले पाहीजे मात्र तसे होत नाही तसेच निर्बंध शिथील झाल्यानेही थोडीसी वाढ झाली होती मात्र प्रशासन पूर्ण क्षमतेने काम करत आहे.
- सुनिल गावडे,
तालुका वैद्यकीय अधिकारी,