कोरोनाचं संकट भारी, आलंया साऱ्या जगावरी, सुरक्षित थांबा तुम्ही घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:12+5:302021-06-03T04:09:12+5:30
गराडे: कोरोनाचं संकट भारी। आलंया साऱ्या जगावरी। सुरक्षित थांबा तुम्ही घरी ।। बाहेर जाऊ नका रस्त्यावरी.. हे ...
गराडे: कोरोनाचं संकट भारी। आलंया साऱ्या जगावरी।
सुरक्षित थांबा तुम्ही घरी ।।
बाहेर जाऊ नका रस्त्यावरी.. हे प्रबोधन गीत सुप्रसिद्ध लोकगीताच्या चालीवर आपल्या पहाडी आवाजात सादर करत लोककलावंत अर्जुन लगस, संतोष कांबळे व त्यांचे सहकारी पुरंदर तालुक्यात कानाकोपऱ्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनोरंजनात्मक जनजागृती करत प्रवास करीत आहेत.
प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, पुणे महाराष्ट्र व गोवा राज्य
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकार व कोविड-१९ लसीकरण जनजागृती अभियानांतर्गत चित्ररथ पुणे जिल्ह्यातील पुरंदर व भोर तालुक्यात दाखल होऊन या चित्ररथातून कलाकारांच्या वतीने
आत्मनिर्भर भारत व कोविड-१९ लसीकरण जनजागृती महा अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाची संकल्पना प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो मनीष देसाई यांची आहे. प्रकाश मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली व निखिल देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांचे योगदान लाभत आहे.
श्रीनाथ प्रतिष्ठान सातारा निर्मित जनजागृती कलापथकाच्या पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त केले जात आहे. शिवाय, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी व त्यासंबंधी उपाय योजनांची माहिती या चित्ररथावरील कलाकार अर्जुन लगस व संतोष कांबळे हे दोघेही लोकांना गीतातून व पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत सांगत आहेत.
जलतज्ज्ञ सागरतात्या काळे म्हणाले की, हे कलावंत मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायजरचा वापर करा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा, गर्दी ठिकाणी जाणे टाळा,
वयोवृद्ध यांची काळजी लहान मुलांना विनाकारण घराबाहेर पडू देऊ नये. गरोदर मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी.
विनाकारण घराबाहेर पडू नका. घरी राहा, सुरक्षित राहा इत्यादी गोष्टी हे कलाकार आपल्या पहाडी आवाजात गीत गायनातून समजून सांगतात. त्यामुळे लोकांचे प्रबोधन होते.
आत्मनिर्भर भारत स्वप्न करूया साकार.... स्वदेशीला बळ देऊया एकजुटीचा एल्गार....या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होते.
फोटोओळी - काळेवाडी ( येथे कोविड-१९ लसीकरण जनजागृती महाअभियानांतर्गत चित्ररथाद्वारे प्रबोधन करीत असताना अर्जुन लगस व संतोष कांबळे.