यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट;10 टक्केच सोने खरेदी होण्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 06:38 PM2020-04-24T18:38:55+5:302020-04-24T18:48:54+5:30
दुकाने बंद असल्याचा फटका व्यावसायिकांना बसणार
पुणे: साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेवर यंदा कोरोनाचे सावट आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र टाळेबंदीमुळे दुकाने बंद असल्याचा फटका सराफी आणि इतर व्यावसायिकांना देखील बसणार आहे. दरवर्षी या दिवशी सोने खरेदीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते.यंदा मात्र केवळ 10 टक्केच आॅनलाइन सोने खरेदी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हिंदू दिनदर्शिकेत अक्षय्य तृतीयेला विशेष महत्व आहे. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. विष्णू पार्वतीचे स्वामित्व असलेली ही तिथी आहे. यंदा रविवारी ( 26 एप्रिल) हा योग जुळून आला आहे. हा दिवस अत्यंत शुभ मानला गेल्याने या दिवशी एखाद्या नवीन कामाला प्रारंभ किंवा नवीन वस्तूंची खरेदी करण्याची प्रथा वषार्नुवर्षे चालत आली आहे. या दिवशी जे शुभ कार्य केले जाते. त्याचे फळ अक्षय मिळते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होणार नाही. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी केल्यास ते वृद्धिंगत होत जाते असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी प्रामुख्याने ग्रॅम पासून ते तोळ्यापर्यंत सोने खरेदी करण्यावर भर दिला जातो. मात्र यंदाच्या अक्षय तृतीयेवर कोरोनाचे संकट ओढावले आहे. एरवी या दिवशी गजबजणारा लक्ष्मी रस्ता, रविवार पेठ, सोन्या मारुती चौक अशा सर्वच भागांमध्ये नीरव शांतता असणार आहे. कोरोनामुळे पुढचे चित्र स्पष्ट नसल्याने अनेकांनी खरेदीसाठी हात आखडता घेतला आहे. मिठाईची दुकाने देखील बंद असल्याने यंदाचा हा सण घरातीलच गोडधोड पदार्थ करून सर्वजण साजरा करणार आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग मुळे एकमेकांना भेटता येणे शक्य नसल्याने सोशल मीडियावरच शुभेच्छा देऊन हा सण 'गोड' मानावा लागणार आहे.
.........
यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट आहे हे खरं आहे. दुकाने बंद असल्याने सोने खरेदीवर परिणाम होणार आहे.तरीही आम्ही शासनाच्या सूचनांचे पालन करणार आहोत. या दिवशी सोने खरेदीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. मात्र यंदा ऑनलाइन माध्यमातून केवळ 10 टक्केच खरेदी होईल. ऑर्डर दिलेल्या ग्राहकांना दहा ते पंधरा दिवसांनी डिलिव्हरी दिली जाईल- फत्तेचंद रांका, अध्यक्ष पुणे सराफ असोसिएशन आणि पुणे व्यापारी महासंघ
.............