कोरोनाचा भुर्दंड स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:10 AM2021-01-14T04:10:11+5:302021-01-14T04:10:11+5:30
विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी : अभ्यासिका व वसतिगृह चालकांनी शुल्कवाढ केली पुणे : कोरोनामुळे कोलमडलेले आर्थिक गणित जुळविण्यासाठी शहरातील काही ...
विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी : अभ्यासिका व वसतिगृह चालकांनी शुल्कवाढ केली
पुणे : कोरोनामुळे कोलमडलेले आर्थिक गणित जुळविण्यासाठी शहरातील काही अभ्यासिका व वसतिगृह चालकांनी शुल्क वाढ केली आहे. मात्र, कोरोनाने सर्वांचीच आर्थिककोंडी केल्यामुळे वाढीव शुल्क विद्यार्थ्यांच्या माथी मारून गेल्या आठ महिन्यांतील तोटा भरून काढू नये, अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
स्पर्धा परीक्षांचे हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात लाखो विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा सेवा आयोगाच्या विविध परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात. शहरातील मुख्य पेठांसह उपनगरांच्या काही भागात अभ्यासिकांमध्ये अभ्यास करतात, तसेच कॉट बेसिस व किंवा भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहतात. मात्र, कोरोनामुळे पुणे शहर विद्यार्थ्यांनी रिकामे केले होते. परिणामी, अभ्यासिका चालक, मेस चालक, वसतिगृह चालक या सर्वांची आर्थिककोंडी झाली. तब्बल आठ महिने विद्यार्थी गावी गेल्यामुळे सर्वांचाच व्यावसाय ठप्प झाला. अनेकांना बँकेकडून कर्ज काढून सुरू केलेल्या अभ्यासिका व वसतिगृहांचे कर्जाचे हप्ते भरणे शक्य झाले नाही. मात्र, आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आली असून, विद्यार्थी शहरात येण्यास सुरुवात झाली आहे.
एमपीएससीने राज्य सेवा परीक्षेसह संयुक्त परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे गावाकडून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. या पार्श्वभूमीवर काही वसतिगृह चालक व अभ्यासिका चालकांनी आपल्या शुल्कात २० ते २५ टक्के वाढ केली आहे, परंतु काहींनी विद्यार्थी हिताचा विचार करून पूर्वीचे शुल्क कायम ठेवले असून, काहींनी शुल्कात कपात केली आहे.
---
अभ्यासिकेसाठी पूर्वी एका महिन्यासाठी ९०० रुपये शुल्क द्यावे लागत होते. आता विद्यार्थ्यांकडून १,२०० ते १,५०० रुपये शुल्क आकारले जात आहे, तसेच खोली भाड्यासाठी आकारले जाणारे दोन ते अडीच हजार रुपये शुल्क तीन ते साडे तीन हजार रुपयांपर्यंत वाढविले आहे, परंतु कोरोनामुळे सर्वांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, विद्यार्थी हिताचा विचार करून अभ्यासिका व वसतिगृह चालकांनी शुल्कवाढ करू नये.
- अनुप देशमुख, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी