आंबेगाव तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी; ६४ वर्षीय व्यक्तीचा पिंपरीत उपचार सुरु असताना मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 03:52 PM2020-06-06T15:52:46+5:302020-06-06T15:54:15+5:30
कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे..
घोडेगाव : नारोडी (ता. आंबेगाव) येथील ६४ वर्षीय कोरोना बाधित व्यक्तीचा आज पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यू झाला. तालुक्यातील ४३ पैकी १० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने तालुक्यातील लोकांची भीती कमी झाली होती. पण कोरोनाचा पहिला बळी गेल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
हा रूग्ण मुंबई येथील घाटकोपर येथून २१ मे रोजी आठ जणांच्या कुटुंबासह आला होता. ३१ मे रोजी त्रास होऊ लागल्याने पुणे येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर लगेचच घरातील ८ व शेजारचे दोन जण अशा दहा जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी त्याच्या मृत्यूची बातमी आली.
दरम्यान तालुक्यात सध्या ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. साकोरे, शिनोली, घोडेगाव व पिंगळवाडी या गावातील रुग्ण घरी परतल्यामुळे ही गावे कोरोनामुक्त झाली आहेत. तसेच गिरवली येथील तीन रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.नारोडी येथील रूग्ण मयत झाल्याबरोबर ग्रामपंचायत व ग्रामस्तरीय समितीला प्रशासनाने सुरक्षे संदर्भात सूचना केलेल्या आहेत. तहसिलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, घोडेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे हे सद्य परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. या कोरोनाबाधित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोना तपासणीसाठी सोमवार (दि.८) रोजी नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.