उरुळी कांचन येथे कोरोनाचा कहर काही थांबेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:11 AM2021-03-17T04:11:32+5:302021-03-17T04:11:32+5:30
उरुळी कांचन व परिसरात कोरोनाने कहर माजवला असून या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला नागरिक सहकार्य करीत नाहीत ही एक बाजू ...
उरुळी कांचन व परिसरात कोरोनाने कहर माजवला असून या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला नागरिक सहकार्य करीत नाहीत ही एक बाजू आहेच, पण स्थानिक प्रशासन जसे ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल व पोलीस कठोर कारवाईची भूमिका घेत नसल्याने रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. एका दिवसात २१ रुग्ण सापडण्याचा उच्चांक झाला आहे ! तसाच उच्चांक गेल्या ४८ तासात ३५ रुग्ण सापडल्याने झाला आहे. गेल्या ४८ तासात ३५ रुग्ण सापडले आहेत. या वृताला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. सुचिता कदम यांनी दुजोरा दिला आहे. उरुळी कांचन ग्रामपंचाय़त हद्दीत सुमारे ४५ ॲक्टीव्ह रुग्ण असतानाही, काही नागरिक मास्कविना फिरताना सामाजिक अंतर पाळत नाहीत तर दुकानदार सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, पोलीस प्रशासनाने कायद्याचा कडक बडगा उगारल्याशिवाय, नागरिक व व्यापारी सुधारणार नाहीत, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकार्यांनी केली आहे. उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अद्ययावत आकडेवारीनुसार आजपर्यंत ११७३ जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील १०९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर आत्तापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला असून ४५ जण ॲक्टीव आहेत.गावातील किराणा व कापडाच्या बाजारपेठा, भाजी मंडई, शासकीय कार्यालये, बँका, पतपेढ्या, वाढदिवस व लग्न समारंभ ठिकाणे येथे कोणत्याही प्रकारची कोरोना प्रतिबंधक उपायांची बंधने पाळताना नागरिक व तेथील कर्मचारी दिसत नाहीत. हे कोरोनाचा प्रसार होण्याचे महत्वाचे कारण दिसत आहे त्यासाठी कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी जोर धरत आहे.