पूर्व हवेली पुन्हा बनतेय कोरोनाचा हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:06 AM2021-03-30T04:06:53+5:302021-03-30T04:06:53+5:30
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील बऱ्याच गावात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून येत आहेत. यामुळे लोणी काळभोर, उरुळी कांचन ...
कदमवाकवस्ती : पूर्व हवेलीतील बऱ्याच गावात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळून येत आहेत. यामुळे लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या मोठ्या ग्रामपंचायतीसह पूर्व हवेली पुन्हा एकदा कोरोनाच्या हॉटस्पॉटच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्व हवेलीमधील तेरा ग्रामपंचायत हद्दीत पाचशेहून अधिक कोरोनाचे नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या मोठ्या ग्रामपंचायतीसह पूर्व हवेलीत मागील दहा दिवसांपासून कोरोना हैदोस घालत असतानाही, ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस यंत्रना कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत आहेत. कोरोना दरवाज्यात आला असतानाही, नागरिक मात्र बेजबाबदारपणे वावरत असल्याचे चित्र पूर्व हवेलीत दिसून येत आहे. आरोग्य विभाग सध्या लसीकरणाच्या कामात गुंतला असला, तरी ग्रामपंचायत प्रशासन व पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याशिवाय कोरोना वाढीला प्रतिबंध बसणार नाही. लोणी काळभोर, उरुळी कांचनसह पूर्व हवेलीत कोरोना मागील दहा दिवसांपासून हैदोस घालत असला, तरी नव्वद टक्क्यांहून अधिक नागरिक आपण त्या गावचेच नाही, अशा अविर्भावात मास्कशिवाय व सोशल न पाळता गर्दीत राजरोसपणे वावरत आहेत. उरुळी कांचन ग्रामपंचायत वगळता, पूर्व हवेलीमधील इतर ग्रामपंचायतीचे प्रशासन ढिम्मच असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजीपाला खरेदीच्या नावाखाली नागरिक ठिकठिकाणी गर्दी करत आहेत. नाहक गर्दी टाळण्याबरोबरच, मास्क व सॅनिटायझर वापरण्याबाबत दिल्लीपासून गल्लीपर्यंत प्रबोधन केले जात असतानाही, पूर्व हवेलीत नव्वद टक्क्यांहून अधिक नागरिक मास्कशिवाय घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव गर्दीत होत असल्याचे माहीत असतानाही, ग्रामपंचायत प्रशासन व अथवा पोलीस यंत्रणा गर्दीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर?
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग व पोलीस यंत्रणांना वेळोवेळी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोग्य विभाग सध्या कोरोनावरील लक्षीकरणात गुंतला असल्याने, स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन कोरोनावरील उपाययोजना राबविण्याबाबत कागदोपत्री ॲक्टिव्ह असल्याचे दाखवून देत आहे.
कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यावर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच पूर्व हवेलीमधील अनेक खासगी रुग्णालयात स्वॅब चाचणी करण्यात येत आहे. मात्र, स्वॅब चाचणी केल्यानंतर, तपासणी अहवाल येण्यास चोवीस ते छत्तीस तासांचा विलंब होत असल्याने, तपासणी केलेले अनेक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असतानाही राजरोसपणे गर्दीत फिरत असल्याचे दिसून येत आहे, तर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आसपासच्या नागरिकांना समजू नये, यासाठी अनेक पॉझिटिव्ह रुग्ण परिसरात फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे आशा घटना धोकादायक आहेत, लोणी काळभोर, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती या तीनही ग्रामपंचायत हद्दीतील बाजारपेठातील भाजी मंडई, स्नॅक्स सेंटरचे दुकाने, किराणा दुकाने, तसेच चौकाचौकांमध्ये चांडाळ चौकशी करणारे तरुणांच्या टोळ्या मास्क न घालता उभे राहताना दिसून येत आहेत. मात्र, लोणी काळभोर कांहीही कारवाई करत नसल्याने, कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
चौकट
लोणी काळभोर पोलिस ठाणे आठ दिवसांपूर्वी शहर पोलिसांना जोडले गेल्याने, पोलीस यंत्रणा अद्याप कोमातच असल्याचे दिसून येत आहे. मागील आठ दिवसांच्या काळात लोणी काळभोर पोलिसांनी गर्दी हटविणे, अथवा मास्कशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. पोलीस यंत्रणा रस्त्यावर दिसत नसल्याने, नागरिक बेजबाबदारपणे वावरत असल्याचे चित्र संपूर्ण पूर्व हवेलीत दिसून येत आहे.