कोरोनाचा संदर्भात नवा खुलासा! फुफ्फुसात सहज राहू शकतात किमान पाच ते दहा हजार विषाणू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:20 PM2021-06-08T18:20:35+5:302021-06-08T18:30:22+5:30
कोरोना विषाणूचे वजन केवळ १०० ते १५० नॅनोमीटर
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोना विषाणूपेक्षा फुफ्फुसातील पेशी हजारो पटींनी मोठ्या असतात. फुफ्फुसातील पेशीत किमान पाच ते दहा हजार कोरोना विषाणू सहज राहू शकतात. एवढ्या छोट्या कोरोना व्हायरसचे वजन शोधण्याचा इस्राईल आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी प्रयत्न केला. इस्राईलमधील वेईझमँन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांनी विषाणूच्या वजनाचे अनुमान काढले आहे. अमेरिकेच्या नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये ते प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार कोरोना विषाणू १०० ते १५० नॅनोमीटर एवढया लहान आकाराचा असतो, अशी माहिती इंग्लडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली.
डॉ. थोरात म्हणाले, 'कोरोना उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यासाठी किचकट तंत्रज्ञान वापरून तयार केलेला सूक्ष्मदर्शक वापरावा लागतो. त्याची किंमत अंदाजे दहा कोटीपेक्षा अधिक आहे आणि तो ठेवण्यासाठी दोन कोटीची एक रूम तयार करावी लागते. अमेरिका चीन, जपान आणि युरोपियन देशांमध्ये काही सूक्ष्मदर्शक आहेत. यामधून १०० ते १५० नॅनोमीटर एवढ्या लहान आकाराचा कोरोना व्हायरस पाहू शकतो. शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एका व्यक्तीला सुरुवातीला संसर्ग होतो तेव्हा त्याच्या शरीरात शंभर कोटीच्या आसपास व्हायरस असतात. संसर्ग खूपच वाढला तर व्हायरसचे प्रमाण एक हजार ते दहा हजार कोटीपर्यंत जाते. एका व्यक्तीत दहा हजार कोटी एवढे व्हायरसचे प्रमाण धरले तर त्या सर्वांचे वजन भरते. फक्त शंभर मायक्रोग्रॅम म्हणजेच एका मिलिग्रॅम पेक्षा दहा पटीने कमी म्हणजेच जगभरातील सध्याच्या संसर्गग्रस्त व्यक्तींमध्ये मिळून व्हायरसचे वजन जास्तीत जास्त फक्त १० किलोग्रॅम एवढेच भरेल.'
जेव्हा कोरोनाचा संसर्ग फुफुसांमध्ये पसरतो तेव्हा तो रोखणे अवघड
शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळेतील प्रयोगातून तयार केलेल्या मॉडेलनुसार फुफ्फुसामधील जास्तीत जास्त एक कोटी पेशींना कोरोना व्हायरसचा संसर्ग होतो. आपल्या शरीरात एकूण ३ ट्रिलियन पेशी असतात. सुरवातीच्या संसर्गामध्ये फक्त दहा व्हायरस एका पेशीमध्ये प्रवेश करतात आणि सुरवातीला या पेशींची संख्या फक्त दहा हजार असते. कोव्हीडच्या अत्युच्य पातळीवर संख्या वाढून व्हायरस एक कोटी पेशींना संसर्गित करतात आणि त्यावेळी एका पेशीमध्ये सरासरी एक हजार ते दहा हजार व्हायरस वाढलेले असतात. व्हायरसने शरीरात प्रवेश केल्यावर आपली प्रतिकारशक्ती त्याला ओळखते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करते. अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण रक्तामध्ये अधिक असते तर फुफ्फुसामध्ये फारच कमी असते. त्यामुळेच जेव्हा कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसांमध्ये पसरतो तेव्हा तो रोखणे अवघड होते. एका व्हायरसवर एक हजारापेक्षा अधिक अँटीबॉडीज चिकटलेल्या असतात. दहा व्हायरसवर शंभर अँटीबॉडीज जाऊन चिकटल्या तरी व्हायरसची संख्या वाढतच जाते. दहा हजारापासून दहा कोटी पेशींना संसर्ग करून व्हायरस स्वतःची संख्या शंभर कोटीपेक्षा अधिक करतो, तेव्हासुद्धा त्याचे वजन फक्त काही मायक्रोग्रॅम असते. असेही त्यांनी सांगितले आहे.