जंतनाशक गोळ्या वाटप योजनेला कोरोनाचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:12 AM2021-03-07T04:12:06+5:302021-03-07T04:12:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. अंगणवाडी आणि आशासेविकांमार्फत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्याची मोहीम सुरू आहे. अंगणवाडी आणि आशासेविकांमार्फत याचे जिल्ह्यात वाटप सुरू आहे. मात्र, वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शाळा आणि अंगणवाड्या बंद असल्याने या गोळ्यांचे वाटप करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
जिल्ह्यात १ ते ६ आणि ६ ते १९ पर्यंत वयाच्या मुलांना जंतनाशक गोळ्या वाटपाची माेहीम आराेग्य विभागामार्फत सुरू आहे. यासाठी ३ हजार ३१ आशासेविका या आैषधांचे वाटप करत आहे. जिल्ह्यातील ४ हजार ६२१ अंगणवाड्या, तर ४ हजार ३६४ पेक्षा जास्त शाळा आहेत. या दोन्हीतील जवळपास १० लाख ५२ हजार २५३ विद्यार्थ्यांना या गोळ्या वाटल्या जाणार आहेत. मात्र, कोरोनामुळे शाळा आणि अंगणवाड्या बंद आहेत. यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अनेक अडचणी येत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे अनेक निर्बंध पुन्हा जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. यामुळे घरोघरी जाताना या निर्बंधांचा सामना या मोहिमेत सहभागी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे. असे असले तरी घरोघरी जात मुलांना ही जंतनाशक आैषधे वाटली जात आहे.
चौकट
तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची फाैज
जिल्ह्यात जंतनाशक आैषधांचे वाटप करण्यासाठी जवळपास ३ हजारांहून अधिक आशासेविका कार्यरत आहेत. त्यांच्याद्वारे घरोघरी जाऊन आैषधांचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, कोरोनामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत आैषधांचे वाटप करावे लागत आहे.
चाैकट
घरोघरी जाणार पण कसे?
कोरोनामुळे शाळा बंद आहेत. यामुळे घरी जाऊनच या गोळ्यांचे वाटप करावे लागणार आहे. पण कोरोनामुळे अनेक निर्बंध असताना घरोघरी जायचे कसे, असा प्रश्न या मोहिमेत सहभागी असलेल्यांना पडला आहे.
कोट
जिल्ह्यात जंतनाशक आैषधांचे वाटप सुरू आहे. यासाठी आशासेविका कार्यरत आहेत. कोरोनामुळे घरोघरी जाऊन त्यांना वाटप करावे लागणार आहे. काही अडचणी त्यांना येत असल्या, तरी त्या स्वत:ची काळजी घेत याचे वाटप करत आहेत.
-भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी