विद्यापीठाच्या अधिसभेवर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:12 AM2021-03-17T04:12:17+5:302021-03-17T04:12:17+5:30
पुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा ऑफलाईन पध्दतीने होणार की ऑनलाईन? ...
पुणे : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अधिसभा ऑफलाईन पध्दतीने होणार की ऑनलाईन? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, विद्यापीठाने पर्यायी सभागृहांचा विचार करून ऑफलाईन पध्दतीनेच अधिसभेची बैठक घ्यावी, अशी मागणी अधिसभा सदस्यांनी केली आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने व स्थानिक प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या २० मार्च रोजी आयोजित करण्यास राज्यपाल कार्यालयाने मान्यता दिली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने शासनाने व स्थानिक प्रशासनाने काही कठोर पाऊले उचलली आहेत. त्यात ५० पेक्षा जास्त व्यक्तिंना एकत्र येता येणार नाही,असे स्पष्ट केले आहे. मात्र, विद्यापीठाच्या अधिसभेस पुणे,अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सुमारे ७८ सदस्य, विद्यापीठाचे सुमारे २० अधिकारी व कर्मचारी आणि माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित असतात. त्यामुळे अधिसभेसाठी १०० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येतात.
विद्यापीठाचे अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांनी विद्यापीठाची अधिसभा ऑफलाईन पध्दतीनेच घ्यावी. या मागणीचे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना दिले आहे. तसेच विद्यापीठात ११० व्यक्तींची बैठक व्यवस्था करता येऊ शकते, असे सभागृह उपलब्ध आहे. या सभागृहात अधिसभा घेणे शक्य नसल्यास आयुकाच्या सभागृहाच्या पर्यायी विचार करावा. विद्यापीठाने ऑनलाईन अधिसभा घेऊ नये. मागील वर्षी घेण्यात आलेल्या ऑनलाईन अधिसभेदरम्यान कनेक्टिव्हिटीची अडचण आली. सदस्यांना एकमेकांचा आवज ऐकू येत नव्हता.त्यामुळे अधिसभा ऑफलाईनच घ्यावी,असे ढोरे यांनी निवेदनात नमूद केले आहे .
--
विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक ऑफलाईन? पध्दतीने घेण्याबाबत सध्या नियोजन केले जात आहे. मात्र,कोरोनाबाबत शासन व स्थानिक प्रशासनाच्या नियमावलीचा अभ्यास करून आणि कायदेशीरबाबी तपासून अधिसभा ऑनलाईन घ्यावी की ऑफलाईन? याबाबत निर्णय घेतला जाईल.
- डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ