इंदापूरमध्ये सापडला कोरोनाचा सहावा रुग्ण ; सुट्टीवर आलेल्या पुण्याच्या पोलिसाला संसर्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 12:57 AM2020-05-24T00:57:20+5:302020-05-24T00:57:46+5:30
कोरोना संक्रमित आढळल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात ११ व्यक्ती आल्याने इंदापूर तालुक्यात चिंतेत वाढ
इंदापूर (कळस): इंदापूर तालुक्यात कोरोनाचा सहावा रुग्ण सापडला आहे. पळसदेव (ता. इंदापुर) येथे सुट्टीवर आलेल्या पुणे पोलिसाला कोरोना संसर्ग झाला आहे . एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्यानंतर रुग्णाच्या संपर्कात ११ व्यक्ती आल्याने इंदापूर तालुक्यात चिंतेत वाढ झाली आहे .येथील एक कर्मचारी शुक्रवारी (दि २२)दोन दिवसाची सुट्टी काढून आपल्या मूळ गावी आला होता.
दोन दिवस घरी थांबल्यानंतर सोमवारी पहाटे तो पुन्हा पुणे येथे कार्यरत असणाऱ्या आपल्या मुख्यालयात हजर झाला .मात्र, अचानक तब्येत बिघडल्याने तात्काळ या व्यक्तीला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.त्याची वैद्यकीय तपासणी केली असता सदर पोलीस कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील पळसदेव गावातील ९व्यक्तींचे अख्खे कुटुंब आणि त्याच्या शेजारी राहणाऱ्या २ अशा एकूण ११ व्यक्ती कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्या आहेत.
तालुक्यातील शिरसोडी नंतर पोंदकुलवाडी परिसरात दोन कोरोना रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या कुटुंबातील अकरा सदस्यांचे स्वब नमुने कोरोना चाचणी साठी घेण्यात येणार आहे. या कुटुंबाला तात्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार असल्याची माहीती तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.