कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं गणेशोत्सवावर विघ्न; पुणेकरांचा यंदाही उत्सव साध्या पध्दतीने साजरा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 09:41 PM2021-08-02T21:41:03+5:302021-08-02T21:56:33+5:30
यंदाही पुणे शहरात गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आदेश महापालिकेने जारी केले आहेत.
पुणे : कोरोना आपत्तीचे विघ्न अद्यापही हटले नसून, ऑगस्ट अखेर कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज टास्क फोर्सने वर्तविला आहे. त्यामुळे यंदाही पुणे शहरात गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आदेश महापालिकेने जारी केले आहेत. यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढता येणार नसून, सार्वजनिक गणेशोत्सव विनागर्दी व कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करूनच साजरा करावा लागणार आहे. दरम्यान गणेशोत्सवानिमित्त सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये कोणतीही शिथिलता देता येणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले असून, सार्वजनिक गणेशोत्सव २०२१ बाबत मार्गदर्शक सूचना प्रसिध्द केल्या आहेत. या सूचना व आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
-----------------
गणेशमूर्तीची ४ फूट उंचीची मर्यादा कायम
यावर्षीही सार्वजनिक गणेश मंडळांना श्री गणेशमुर्ती ४ फूट उंचीपेक्षा जास्त बसविता येणार नाही़. तर घरगुती गणेश मुर्ती ही २ फूटांच्या आत असावी असे सांगण्यात आले आहे. तसेच यावर्षीही शक्यतो तो पारंपारिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे़ व मूर्ती शाडूची / पर्यावरपूरक असल्यास त्याचे विसर्जन घरच्या घरीच करावे असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच घरात गणेशमूर्ती विसर्जन करणे शक्य नसल्यास जवळील कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करावे़. त्याचप्रमाणे विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबवावे व लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना विसर्जनस्थळी आणू नये असेही सांगितले आहे.
-----------------------
मंडप उभारणीवरही मर्यादा
मंडप उभारणीपेक्षा सार्वजनिक गणेश मंडळांच्या श्रींच्या मुर्तीची प्रतिष्ठापना आहे. त्याच मंदिरात करावी़ अथवा महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन व मंडप आकार लहान ठेवावा. तसेच सार्वजनिक सजावट करताना त्यात भपकेबाज नसावा असे या आदेशात सांगण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आरती, भजन, किर्तन किंवा अन्य धार्मिक कार्यक्रम गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषाणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेशाचे दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकव्दारे करावी असेही सूचित करण्यात आले आहे.
-----------------------------