CoronaVirus News: २७ टक्के पुणेकरांना नोकरी, व्यवसाय, निधी वाटतंय आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 10:25 PM2020-06-07T22:25:37+5:302020-06-07T22:25:57+5:30
पोलिसांच्या लॉकडाऊन 4 सर्व्हेतील निष्कर्ष; ७२ टक्के लोक घराबाहेर पडले
पुणे : लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी नागरिकांना घराबाहेर पडू नये, यासाठी कधी प्रेमाने तर काही काठीचा प्रसाद देऊन शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लॉकडाऊनबाबत पुणेकरांच्या या भावना आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात लॉकडाऊनमुळे सर्व बंद झाल्यामुळे लोकांना आपली नोकरी, व्यवसाय, पैसा, निधीविषयी २७ टक्के पुणेकरांना चिंता वाटते.
लॉकडाऊननंतर पुन्हा नोकरी, व्यवसाय सुरु करणे, निधी उभारणे हे त्यांना आव्हान वाटत असल्याचे या सर्व्हेमधून दिसून आले आहे. त्याचवेळी लॉकडाऊन ४ मध्ये ७२ टक्के लोकांना किराणा सामान आणि वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडावे लागल्याचे नागरिकांनी सांगितले. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते पुणे पोलिसांनी केलेल्या लोकभावनांचे सर्व्हेक्षण या पुस्तिकेचे प्रकाशन पोलीस आयुक्तालयात रविवारी करण्यात आले. लोकांच्या अडचणी ओळखण्यासाठी त्यांचा दृष्टीकोन समजून घेणे, नागरिकांप्रती सहानुभूती जगविणे, आव्हानांवर मात करण्यासाठी एक व्यवस्था तयार करणे या हेतूने हा सर्व्हे करण्यात आला. त्याला पाच दिवसात २२ हजार ७९१ लोकांनी प्रतिसाद दिली.
त्यात ७७ टक्के पुरुष, २३ टक्के महिला होत्या़ २१ ते ३० आणि ३१ ते ४० वयोगटातील अनुक्रमे ३५ व ३९ टक्के तरुणांचा समावेश होता. एक मुल असलेले ३० टक्के तर एकही मुल नसलेले ५५ टक्के लोकांनी त्यात भाग घेतला होता. लॉकडाऊन ४ च्या काळात ३१ टक्के लोकांना दिवसातून एकदा किंवा त्याहून अधिक वेळा बाहेर गेले होते. तसेच ७२ टक्के लोकांना किराणा सामान आणि वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडावे लागले होते. ८३ टक्के लोकांनी पोलीस करीत असलेल्या कामाचे कौतुक केले.
यावेळी नागरिकांनी पोलिसांसाठी काही सूचनाही केल्या. त्यात पोलीस पथकांनी स्वत:चीही काळजी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी सक्त लॉकडाऊन ठेवण्यासाठी सहकार्य करावे. नागरिक मास्क सक्तीने परिधान केलेले आढळून येत नाहीत. अधिक संवाद साधून सामाजिक अंतर राखणे सोपे होईल. समूहाने फिरणाऱ्या लोकांना जबाबदार धरले पाहिजे. कोविड १९ वर अधिक जागरुकता आवश्यक आहे़ लोकांनी कठोर लॉकडाऊनला समर्थन देत रहावे. योग्य वेळी स्पष्ट संदेश असले तर लोकांना मदत होईल, अत्यावश्यक वस्तूंची घरपोच सेवा उपयुक्त ठरेल़ प्रशासनकडून घेतलेले ठाम निर्णय लोकांना मदत करतील. कोविड चाचण्या वाढल्या. परंतु, प्रमाण अधिक वाढल्यास मदत होईल, अशा सूचना नागरिकांनी नागरी प्रशासनाला केल्या आहेत.
लॉकडाऊन कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पोलिसांच्या मदतीला ५ हजार ५०० विशेष पोलीस अधिकाºयांची नेमणूक करण्याचा उपक्रम उत्कृष्ट असून यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या. कोरोना नियंत्रणासाठी लॉक डाऊन कालावधीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व करण्यात येणाºया विविध उपाययोजनांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या.
यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, डॉ. संजय शिंदे, सुनील फुलारी तसेच सर्व पोलीस उपायुक्त व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.