coronavirus : लाॅकडाऊन न पाळणाऱ्यांची रवानगी थेट तुरुंगात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 07:34 PM2020-04-01T19:34:25+5:302020-04-01T19:50:21+5:30
लाॅकडाऊनच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांवर पाेलिसांनी कारवाई केली. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावली.
बारामती : लॉक डाऊन चे पालन न केल्यामुळे न्यायालयाने तिघांना प्रत्येकी तीन दिवसांच्या कैद सुनावली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बारामती तालुक्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मात्र, काहीजण लॉकडाऊनचे पालन करण्याबाबत उदासीन आहेत.त्यामुळे पोलीसांनी पालन न करणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. विनाकारण मोटरसाइकलवर फिरणे, दुकानदाराने सूचनांचे पालन न करणे आदींचा यामधये समावेश होता.
बुधवारी न्यायालयाने तिघाजणांना शिक्षा केली. बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आरोपी अफजल बनीमिया आत्तार (वय ३९ रा.श्रीरामनगर ता.बारामती जि.पुणे.), आरोपी चंद्रकुमार जयमंगल शहा (वय ३८ रा.सुर्यनगरी ता.बारामती जि.पुणे),आरोपी अक्षय चंद्रकांत (शहा वय 32 रा.वडगाव) या तिघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व आरोपींना प्रत्येकी तीन दिवस कैद किंवा ५०० रुपये दंडाची शिक्षा दिली आहे. ही शिक्षा छोटी वाटत असली तरी या व्यक्तीवर भविष्यकाळात चारित्र्य पडताळणीमध्ये शिक्षा झाली म्हणून कोणतीही शासकीय किंवा खाजगी नोकरी मिळणार नाही.
त्याचबरोबर भविष्यकाळात पासपोर्ट, शस्त्र परवाना, व्यवसाय परवाने मिळताना मोठी अडचण निर्माण होणार आहे. आपल्या चुकीमुळे आपले स्वत:चे भविष्य अंधारात टाकणारे हे पाऊल आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपल्या स्वत:च्या घरात बसून गंभीरपणाने लॉक डाऊनचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर यांनी केले.