coronavirus : पुण्याची वाटचाल हॉटस्पॉट होण्याकडे? एका दिवसात ३७ पाॅझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:01 PM2020-04-06T22:01:46+5:302020-04-07T10:32:18+5:30
पुणे, पिंपरी चिंचवड, ग्रामीण मिळून आतापर्यंत १४२ रूग्ण
पुणे: शहर व जिल्ह्याचीही वाटचाल आता झपाट्याने कोरोना हॉटस्पॉट कडे होऊ लागली आहे. शहर व पिंपरी चिंचवडसह पुण्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधीत रूग्णांची संख्या आता १४२ झाली आहे.
पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रूग्णालयासह भारती व शहरातील वेगवेगळ्या रूग्णालयात हे रूग्ण दाखल असून त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली.
पुणे शहरात सोमवारी एका दिवसात ३७ रूग्ण आढळले. या सर्वांच्या घशातील स्रावाचे तपासणी अहवाल पॉझेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने पुण्यातील पेठांचा पुर्व भाग तसेच कोढवा सारखी ऊपनगरे सील ( घराबाहेर येणे जाणे पुर्णतः बंद) करण्यास सुरूवात केली आहे. यासंबधीचे आदेश प्रशासानाकडून रात्री उशिरापर्यंत जारी होत होते.
पुण्यात आतापर्यंत कोराना ने ५ रूग्णांचा बळी घेतला आहे. त्यातच सोमवारी एकदम ३७ रूग्णांंना संसर्ग झाल्याचे तपासणीत आढळल्यामुळे प्रशासानाची धावपळ ऊडाली आहे. पुणेकरही धास्तावले दिसत आहेत.
जिल्हा प्रशासनाने आता बरीच मोठी पुर्वतयारी सुरू केली आहे. त्यात खासगी रूग्णालयांमधील खाटा आरक्षीत करणे, ज्या भागात रूग्ण जास्त संख्येने आढळत आहेत तो संपूर्ण परिसर बंद करणे, त्या भागातील नागरिकांची थेट घरी जाऊन तपासणी करणे अशा ऊपायांचा समावेश आहे.
सुदैवाने सोमवारी रात्री उशिरापर्यंत तरी कोणत्याही रूग्णांचा म्रुत्यू झाला नव्हता. त्यामुळेच स्थिती अजूनही आटोक्यात येऊ शकते अशा विश्वासातून प्रशासन गतीशील झाले आहे.
पुण्यात सोमवारी 151 नवीन कोरोना संशयित व्यक्तींना विविध रूग्णालयांत दाखल करून घेण्यात आले. यापैकी 38 व्यक्तींचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. यामुळे पुढे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 142 वर जाऊन पोहचली आहे.
कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या
पुणे शहर : 114, पिंपरी चिंचवड: 20, पुणे कॅन्टोनमेन्ट : 1, बारामती: 2, हवेली : 1, जुन्नर: 1, शिरूर: 1 आणि मुळशी : 1