coronavirus : तबलिगी जमातशी संबंधित ८ टान्झानियाच्या नागरिकांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 06:51 PM2020-04-05T18:51:12+5:302020-04-05T18:52:39+5:30
तबलिगी जमातशी संबंधित असलेल्या 8 टान्सानियाच्या नागरिकांवर साथीचा राेग कायद्याचा भंग केल्याप्रकरणी तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे : तबलिगी जमातशी संबंधित पुण्यातील विविध मशिदीमध्ये राहणार्या ८ टान्झानियाच्या नागरिकांवर कोरोना संबंधीत साथीच्या रोगाचा कायद्याचा भंग
केला तसेच परकीय नागरिक कायद्याचा भंग केल्याखाली गुन्हा दाखल केला आहे. तसेच टुरिस्ट व्हिसावर येऊन धार्मिक प्रचार करत करुन त्यांनी व्हिसा कायद्याचा भंग केला आहे.
पुण्यातील कोंढवा, कासेवाडी, मोमीनपुरा, घोरपडी, हडपसर खडकी येथील मश्जिदमध्ये त्यांचे वास्तव होते. ते पुण्यात ११ मार्च २०२० पासून आले होते. त्यांनी स्वत: ला क्वारंटाईन करुन घेणे अपेक्षित असताना त्यांनी तसे केले नाही. तसेच लॉकडाऊनचे उल्लंघन केले आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज मध्ये उपस्थित राहिलेल्यांपैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याचे समजल्यावर पुणेपोलिसांनी शोध सुरु केला होता. त्यात तबलिगी जमातशी संबंधित हे टान्झानियाचे नागरिक पुण्यातील विविध मशिद व मदरशांमध्ये रहात असल्याचे आढळून आले. कोविड १९ या साथीच्या रोगाच्या संदर्भात शासनाने पारित केलेल्या लॉक डाऊनच्या विविध आदेशांचे त्यांनी उल्लंघन केले आहे.
याप्रकरणी विशेष शाखेचे पोलीस नाईक मयुर सूर्यवंशी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध कलम १८८ तसेच २६९, २७०, परकीय नागरिक कायदा १४, साथीचा रोग प्रतिबंध कायदा १८९७, महाराष्ट्र कोवीड १९ अंमलबजावणी कायदा कलम २१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, टान्झानियाचे नागरिक असलेले हे ८ जण ११ मार्च रोजी पुण्यात टुरिस्ट व्हिसावर आले होते. शहरातील विविध मश्जिदीमध्ये राहत असल्याचे आपल्याला २३ मार्च रोजी समजले होते. त्यानंतर आपण त्यांना ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यांना होम क्वारंटाईन रहायला सांगितले होते. चौकशी दरम्यान, ते टुरिस्ट व्हिसावर आल्याचे व त्यादरम्यान ते धार्मिक प्रचार करीत असल्याचे आढळून आले. टुरिस्ट व्हिसानुसार हा परकीय नागरिक कायद्याचा भंग असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांनी साथीचा रोग कायद्याचाही भंग केला आहे. सध्या ते आरोपी असून त्यांना इन्स्टिट्युटशन क्वारंटाईन करण्यात आले आहे.