Coronavirus: महापौरानंतर पुण्यातील नगरसेवकांना कोरोना; खासदार, आमदार झाले क्वारंटाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:32 PM2020-07-06T14:32:08+5:302020-07-06T14:33:48+5:30
महापालिकेतल्या या बातमीनं पुण्यातील राजकीय वातावरण हादरलं आहे.
पुणे – राज्यात पहिला कोरोनाग्रस्त पुणे शहरात आढळल्यानंतर खळबळ माजली होती, राज्यात कोरोनाबाधितांचा हा आकडा १ लाखांच्या वर पोहचला आहे, आजही पुणे शहर कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे, अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पालिकेच्या वर्तुळात भीतीचं सावट निर्माण झालं. पुण्याच्या महापौरापाठोपाठ आता पालिकेतील काही नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
महापालिकेतल्या या बातमीनं पुण्यातील राजकीय वातावरण हादरलं आहे. पुण्यातील दोन खासदार आणि ४ आमदार यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे तर आतापर्यंत महापालिकेच्या २०० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. पुणे महापालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
दरम्यान, मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकारयांसोबत नाला सफाई आणि पावसाळा पूर्व कामांचीदेखील पाहणी केली होती. या कालावधीत त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी केली होती. परंतु ही तपासणी निगेटिव्ह आली होती. यापूर्वी त्यांना किरकोळ सर्दी, खोकला होणे असा त्रास झालेला होता. परंतु, दरवेळी टेस्ट निगेटिव्ह आली. दरम्यान, ताप आल्याने त्यांनी पुन्हा कोरोना टेस्ट करून घेतली. ही टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली. ते खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले असून लवकरच बरा होऊन पुणेकरांच्या सेवेत हजर होईन असे महापौरांनी ट्विट केले आहे. मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही चाचणी करण्यात आली, यात त्यांच्या कुटुंबातील ८ सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.
राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती, या नेत्यांनी कोरोनावर यशस्वी मात करत पुन्हा सार्वजनिक जीवनात परतले आहेत. तर अलीकडेच अपक्ष आमदार गीता जैन यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
चीनविरुद्धच्या संघर्षात रशियाने केली भारताची छुप्या पद्धतीनं मोठी मदत
...अन्यथा होणार कारवाई; लॉकडाऊनचं कठोर पालन करण्यासाठी सरकारचे '७ कलमी' आदेश
कोरोनापाठोपाठ आणखी एका विषाणूचा मानवाला धोका; चीनने केला अलर्ट जारी
रुग्णालयाची धक्कादायक ऑफर; २५०० रुपयांत कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट मिळेल