coronavirus: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील भुशी धरण यंदा पर्यटनासाठी राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 07:54 PM2020-06-07T19:54:57+5:302020-06-07T19:55:52+5:30
भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते.
लोणावळा : पावसाळी पर्यटनासाठी लोणावळ्यात येणार्या पर्यटकांनो थांबा यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहरातील भुशी धरण पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिला आहे. लोणावळ्यातील भुशी धरण व लोणावळा परिसरातील इतर पर्यटनस्थळांप्रमाणेच पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण व ताम्हिणी घाटाचा परिसर, हवेली तालुक्यातील खडकवासला धरण, आंबेगाव तालुक्यातील भिमाशंकर, जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, भोर तालुक्यातील भाटघर धरण व गडकिल्ले परिसर, वेल्हा तालुक्यातील पानशेत धरण व परिसर यावर्षी बंद ठेवण्यात येणार आहेत.
भुशी धरणासह पुणे जिल्ह्यातील वरिल धरण परिसरात पावसाळी पर्यटनासाठी शनिवार व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी होत असते. धरण परिसरात अनेक पर्यटकांचे बुडून मृत्यु होतात. कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. धरण क्षेत्रात पाऊस जास्त होत असल्याने धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढविला जातो व पर्यटक वाहून जाण्याच्या घटना घडतात. यावर्षी देशात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भुशी धरण व लोणावळा परिसर तसेच पुणे जिल्ह्यातील वरील सर्व धरण क्षेत्रांचा परिसर पर्यटकांसाठी बंद करण्यात येत असल्याचे आदेशात म्हंटले आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड सहिता 1860 च्या कलम 188 अन्वये कारवाई केली जाणार आहे.
लोणावळा शहराची पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था कोरोनामुळे मागील दोन अडीच महिन्यात पुर्णतः कोलमंडली आहे. आता पावसाळी सिझन देखिल जाणार असल्याने त्याचा विपरित परिणाम येथिल अर्थकारणावर होणार आहे.