coronavirus : मजुरांना कर्नाटकात घेऊन जाणारा ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 07:29 PM2020-04-03T19:29:33+5:302020-04-03T19:30:12+5:30
मजूरांना घेऊन कर्नाटकला जाणाऱ्या ट्रकवर बिबवेवाडी पाेलिसांनी कारवाई केली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे.
पुणे : राज्यात तसेच शहरात लॉकडाऊन अणि संचारबंदी लागू असताना देखील एका ट्रकमध्ये तब्बल 30 महिला, 40 पुरूष आणि लहान मुलांना घेऊन निघालेला ट्रक बिबवेवाडी पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस ठाण्यात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनक कायदा 2005 च्या कलमानुसार व महाराष्ट्र कोविड 2019 च्या उपायोजना कलम 11 अन्वये ट्रक चालक, कॉन्ट्रॅक्टर आणि कामगार ठेकेदार यांच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा नोंद करून ट्रक जप्त करण्यात आला.
संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक पावस, उपनिरीक्षक थोरात, बोराटे, कर्मचारी पाटील, म्हस्के असे बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते बिबवेवाडीतील विघ्नहर कॉलनी येथे आले असताना त्या ठिकाणाहून त्यांना एक ट्रक जाताना दिसला. स्टाफच्या मदतीने त्यांनी त्या ट्रकला थांबविले. ट्रक चालकाला त्याचा नाव आणि पत्ता विचारल्यानंतर त्याने त्याचे नाव राहुल लक्ष्मण जगताप असल्याचे व बिबवेवाडी येथे राहत असल्याचे सांगितले.
ट्रकची पाहणी केल्यानंतर ट्रकमध्ये त्यांना तब्बल 30 महिला, 40 पुरूष आणि 15 लहान मुले कोंबून बसविल्याचे आढळले. त्यानंतर नागरिकांना घेऊन जाण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की, ट्रकमधील नागरिक हे मुळ कर्नाटक येथील राहणारे असून ते पुणे येथे मजुरी काम करतात. लॉकडाऊनमुळे त्यांना काम नसल्यामुळे त्यांचे ठेकेदार अरिविंद पासलकर व रमेश जाधव यांनी त्यांना कर्नाटक येथे घेऊन जाण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले. परंतु, त्यांच्याकडे कर्नाटक येथे जाण्यासाठी कोणताही परवाना नसल्याचे दिसून आले आहे.