CoronaVirus : कोरोनाच्या संसर्गातही पुणे आघाडीवर असल्याने चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 03:17 AM2020-04-26T03:17:31+5:302020-04-26T03:18:10+5:30
लॉकडाउनला महिना झाल्यानंतरही शहरातील दाटीवाटीच्या भागात तुलनेने संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. तेथील सर्वेक्षण व चाचण्यांवर भर देण्यात आला आहे.
पुणे : देशातील कोरोनाबाधित नवीन रुग्ण दुपटीने वाढण्याचा कालावधी दहा दिवसांवर असताना पुण्यात मात्र हा कालावधी सध्या सहा ते सात दिवसांपर्यंत आहे. मुंबईतील वेगही जवळपास एवढाच आहे. लॉकडाउनला महिना झाल्यानंतरही शहरातील दाटीवाटीच्या भागात तुलनेने संसर्ग अधिक झाल्याचे दिसून येत आहे. तेथील सर्वेक्षण व चाचण्यांवर भर देण्यात आला आहे.
लॉकडाउननंतर कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत घट होत जाईल, अशी सामान्यांसह सरकारचीही अपेक्षा होती. वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब असली तरी रुग्णवाढीचा वेग तुलनेने कमी झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे.
नवीन रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होण्याचा कालावधी दहा दिवसांहून अधिक झाल्याचा दावाही केंद्र सरकारने केला आहे. काही ठिकाणी हा कालावधी १४ दिवस असल्याचे म्हटले आहे. पुण्यात मात्र हा कालावधी काही दिवसांपासून सहा-सात दिवसांवर स्थिरावलेला दिसतो. २४ मार्च रोजी पुण्यात केवळ १९ रुग्ण होते. पुढील सात दिवसांत ही संख्या दुप्पट झाली. त्यानंतर नवीन रुग्ण दुपटीचा दोन तीन दिवसांवर आला. २ एप्रिल रोजी ४६ वरून हा आकडा तीन दिवसांत ११९ वर गेला. ६ एप्रिलनंतर मात्र हा वेग काहीसा कमी झाला. दुपटीचा कालावधी पाच ते सहा दिवसांपर्यंत वाढला. लॉकडाउनमध्ये दुपटीचा वेग सहा ते दिवसांवर स्थिरावल्याचे दिसते. मुंबईत १८ एप्रिल रोजी २२६८ रुग्ण होते. सहा दिवसांत हा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे.
>गर्दीच्या भागात जास्त संसर्ग दिसून येत आहे. तिथे फिजिकल डिस्टिन्सिंगला मर्यादा येतात. लॉकडाऊन नसते तर हा वेग खूप असता. सुरूवातीला हा वेग सुमारे ३ दिवस एवढा होता. आता सातवर गेला आहे.
- डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग