Coronavirus : पुण्यातील एनआयव्हीमध्ये ‘कोरोना’वर होते अंतिम शिक्कामोर्तब
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 04:58 AM2020-03-17T04:58:02+5:302020-03-17T06:50:24+5:30
काळजी घ्या, विलगीकरण महत्त्वाचे, शास्त्रज्ञ बाबासाहेब तांदळे यांचे आवाहन
राजानंद मोरे/राहूल गायकवाड
पुणे : ‘देशभरातील विविध प्रयोगशाळांमध्ये कोरोना नमुन्यांची तपासणी होत असली तरी त्यावर अंतिम शिक्कामोर्तब पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) केले जात आहे. या संस्थेतील शास्त्रज्ञांकडून संबंधित नमुन्यांची पुन्हा तपासणी केली जात आहे. तसेच निगेटिव्ह आलेल्या नमुन्यांमधील सुमारे १० टक्के नमुन्यांची तपासणीही पुन्हा ‘एनआयव्ही’मध्ये होत आहे. तसेच सध्या दररोज ५० ते ६० नमुन्यांची तपासणी केली जात आहे. ही क्षमता २०० ते ३०० पर्यंत वाढू शकते,’ अशी माहिती ‘एनआयव्ही’तील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बाबासाहेब तांदळे यांनी दिली.
‘कोरोना’विषयीच्या विविध मुद्यांवर तांदळे यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. ते म्हणाले, विमानतळावर तपासणी झाल्यानंतर संबंधित प्रवाशामध्ये काही लक्षणे असतील तर त्याला विलगीकरण कक्षात दाखल केले जाते. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही रुग्णालयात दाखल केले जाते. त्यांचे नमुने ‘एनआयव्ही’सह अन्य अधिकृत प्रयोगशाळांमध्ये पाठविले जातात. सध्या ५० हून प्रयोगशाळांमध्ये नमुन्यांची तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासणी याठिकाणी होते. एखादा नमुना पॉझिटिव्ह आला तर ते नमुने पुन्हा ‘एनआयव्ही’मध्ये येतात. तिथे तपासणी झाल्यानंतर अंतिम शिक्कामोर्तब केले जाते. तसेच निगेटिव्ह नमुन्यांपैकी किमान १० टक्के नमुन्यांची पुन्हा एनआयव्हीमध्ये तपासणी होते. यामध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जाते.
एनआयव्हीमध्ये दररोज २०० ते ३०० नमुन्यांची तपासणी करण्याची क्षमता आहे. आमच्याकडे सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ प्रशिक्षित आहेत. सध्या अन्य प्रयोगशाळांमध्येही तपासणी वाढल्याने एनआयव्हीमध्ये केवळ जवळपासचे किंवा पॉझिटिव्ह आलेले नमुने पुन्हा तपासणीसाठी येत आहेत. इटली, इराण अन्य काही देशांमधून घेण्यात आलेल्या नमुन्यांचे प्रमाण काहीसे अधिक आहे. दैनंदिन तपासणीसाठी ८ ते १० शास्त्रज्ञ असून जवळपास ३० तंत्रज्ञही असल्याचे तांदळे यांनी नमूद केले.\
बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांनाही विलग करणे आवश्यक आहे. त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये, हे टाळणे आवश्यक आहे. लागण झालेल्या व्यक्तीशी संपर्क आला नसेल तर कुणीही घाबरू नये. दैनंदिन काळजी घेतल्यास कोणताही संसर्ग होणार नाही.
- डॉ. बाबासाहेब तांदळे,
वरिष्ठ शास्त्रज्ञ, एनआयव्ही
रुग्णालयातून पळालेला रुग्ण परतला
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पुणे तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भोसरी येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील एका रुग्णाsने पलायन केले होते, मात्र, त्याला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भोसरी येथील एका रुग्णाने शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयातून पलायन केले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर प्रशासन व पोलिसांची धावपळ झाली. पोलिसांनी रुग्णाला ताब्यात घेतले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ससून रुग्णालयाला तातडीने ५ कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.